मुंबई : मोबाइल चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या २६ वर्षीय आरोपीने सहार पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. सहार पोलिसांनी मोबाइल चोरीच्या प्रकरणात अंकीत रायला (२६) अटक केली होती. त्याने सोमवारी पहाटे सुमारे ५ च्या सुमारास शौचालयात कापडाच्या सहाय्याने पाइपला गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्याकडे कापड कसे आले याचा पोलीस तपास करीत आहेत. अंकितचा मृतदेह जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
अंकित एका हॉटेलात वेटर म्हणून काम करीत होता. आपल्या सहकाऱ्यांसह तो सहार गावातील एका खोलीत रहात होता. त्या खोलीतील सहकाऱ्यांचे ५ मोबाइल ३० जून रोजी चोरीला गेले होते. याप्रकरणी सहार पोलीस ठाण्यात अंकितविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला रविवारी अटक करण्यात आली होती. चोरलेल्या मोबाइलपैकी ३ मोबाइल परत मिळाले होते. चोरीचा आळ आणि त्यानंतर करण्यात आलेली अटक यामुळे अंकित निराश होता. सहार पोलीस या प्रकरणाची अधिक तपास करीत आहेत.