मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने ‘सरकार मस्त… मुंबईकर त्रस्त’ हे अभियान हाती घेतले आहे. या अभियांनांतर्गत दर आठवड्याला मुंबई महापालिकेतील एक एक घोटाळा बाहेर काढण्याचे काँग्रेसने ठरवले आहे. देवनारमधील पुनर्वसन प्रकल्पात १,२५१ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप खासदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी बुधवारी केला.देवनार येथे पालिकेच्या एम पूर्व विभागातील एका पुनर्वसन प्रकल्पात घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. देवनार येथे ३७ हजार ३६ चौरस मीटर क्षेत्रफळातील २४ हजार ८९१ चौरस मीटर भूखंडावर ३०० चौरस फुटांच्या एकूण २ हजार ६८ घरांच्या बांधकामासाठी २० ऑक्टोबर २०२२ रोजी निविदा काढण्यात आली.
फेब्रुवारी २०२३ मध्ये कंत्राटदार निश्चित करण्यात आला. ७०९.७७ कोटींच्या कामासाठी कंत्राट देण्यात आले. नंतर या प्रकल्पात बदल करून जुलै २०२३ मध्ये संपूर्ण ३७ हजार ३६ चौरस मीटर क्षेत्र समाविष्ट करण्याची शिफारस करण्यात आली. सदनिकांची संख्या वाढवून ३,३९८ करण्यात आली व खर्च १ हजार ४१ कोटींनी वाढवण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. विकासकाची पुन्हा चटई क्षेत्रफळ निर्देशांक (एफएसआय) वाढवण्याची मागणी मान्य करण्यात आली. एकूण प्रकल्प खर्चात ४२.२३ टक्के वाढ करण्यात आली. प्रत्यक्ष काम सुरू नसताना नोव्हेंबर २०२३ रोजी १८.२८ कोटी रुपये देण्यात आले. जानेवारी २०२४ मध्ये पुन्हा १५.९६ कोटी रुपयांचे बिल देण्यात आले. या प्रकल्पाचा कालावधी जून २०२४ मध्ये वाढवून ४० महिने करण्यात आला. परंतु १७ महिन्यांच्या विलंबाबद्दल पालिकेनेने विकासकावर कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
या प्रकरणात मुंबई महापालिका प्रशासनाने विकासकांवर मेहरबानी करत सर्व नियमांना बदल देऊन मुंबईकरांचा पैसा लुटला आहे. हा संपूर्ण घोटाळा १२५१ कोटी रुपयांचा असून या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना शिक्षा करावी व बिल्डरला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
देवनार प्रकल्पात निविदा व आर्थिक अनियमितता आढळली आहे. प्रत्यक्ष काम न करता ८६ कोटी रुपये का अदा करण्यात आले, ३५९ कोटींची खर्चवाढ नवीन निविदेशिवाय का मंजूर केली, प्रकल्पाची व्याप्ती, खर्च, कालावधी का बदलला याची उत्तरे मिळायला हवीत, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.या पत्रकार परिषदेस काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, माजी नगरसेवक अश्रफ आझमी, मोहसीन हैदर, शीतल म्हात्रे, डॉ. अजंता यादव, बब्बू खान, अर्शद आझमी, ट्युलिप मिरांडा, अखिलेश यादव आदी उपस्थित होते.