मुंबई : वर्धा येथील कारखान्यात तयार केलेला पूल गुजरातमधील अहमदाबाद येथे उभारण्यात आला आहे. मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील १० व्या स्टील पुलाचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले. ६० मीटर लांबीचा हा स्टील पूल रेल्वे रुळांजवळ बांधण्यात आला आहे. हा पूल ७ तासांत उभारण्यात आला.
बुलेट ट्रेनच्या संपूर्ण मार्गात २८ पूल उभारण्यात येणार आहेत. यापैकी १७ पूल गुजरामध्ये उभारण्यात येणार आहेत. सध्या गुजरातमधील सुरत, आणंद, वडोदरा, भरूच येथे आठ पुलांची, तर दादरा नगर हवेली येथील सिल्वासा परिसरात एका पुलाची उभारणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात ११ पुलांची उभारणी करण्यात येणार आहे. अहमदाबाद येथे उभारण्यात आलेल्या पुलाची उंची १२ मीटर आणि रुंदी ११.४ मीटर असून तो ४८५ मेट्रीक टन वजनाचा पोलादी पूल आहे. हा पूल वर्धा येथील कारखान्यात तयार करण्यात आला आहे. तसेच हा पूल उभारणीसाठी विशेष वाहनाने बांधकामस्थळी नेण्यात आला. या पूल जमिनीपासून १६.५ मीटर उंचीवर तात्पुरत्या ट्रेस्टल्सवर एकत्र करण्यात आला आणि नंतर २०० टन क्षमतेचे दोन सेमी-ऑटोमॅटिक जॅक वापरून बाजूला सरकवण्यात आला.
बुलेट ट्रेन मार्गावर हे पूल उभारले
- राष्ट्रीय महामार्ग ५३, सुरत, गुजरात येथे ६७३ वजनाचा आणि ७० मीटर लांबीचा स्टील पूल
- भारतीय रेल्वेच्या वडोदरा-अहमदाबाद मुख्य मार्गिकेवर, नाडियाड, गुजरात येथे १,४८६ मेट्रीक टन वजनाचा १०० मीटर लांबीचा स्टील पूल
- दिल्ली-मुंबई राष्ट्रीय एक्स्प्रेस वे, वडोदरा, गुजरात येथे ४,३९७ मेट्रीक टन वजनाचा २३० मीटर लांबीचा पूल
- दादरा आणि नगर हवेलीमधील सिल्वासा येथे १,४६४ मेट्रीक टन वजनाचा १०० मीटर लांबीचा पूल
- पश्चिम रेल्वेवर, वडोदरा, गुजरात येथे ६४५ मेट्रीक टन वजनाचा ६० मीटर लांबीचा पूल
- डीएफसीसी आणि पश्चिम रेल्वे मार्गावर, सुरत, गुजरात येथे १,४३२ मेट्रीक टन वजनाचा १६० मीटर लांबीचा पूल
- डीएफसीसी रेल्वे मार्गावर, वडोदरा, गुजरात येथे ६७४ मेट्रीक टन वजनाचा ७० मीटर लांबीचा पूल
- डीएफसीसी रेल्वे मार्गावर, भरूच, गुजरात येथे १,४०० मेट्रीक टन वजनाचा १०० मीटर लांबीचा पूल
- राष्ट्रीय महामार्ग ४८ (एनएच-४८), नाडियाद, गुजरात येथे २,८८४ मेट्रीक टन वजनाचा २०० मीटर लांबीचा पूल
- अहमदाबाद, गुजरात येथे ४८५ मेट्रीक टन वजनाचा ६० मीटर ४८५ मीटर लांबीचा पूल