मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधील हवा गुणवत्ता निर्देशांक खालावू लागल्यामुळे नागरिक चिंतीत झाले आहेत. मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारावा यासाठी मुंबई महापालिकेतील संबंधित अधिकारी, कर्मचारी ठोस उपाययोजना करणार की नाही, असा सवाल उपस्थित करीत मुंबई महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते आणि मुंबई भाजप उपाध्यक्ष रवी राजा यांनी प्रशासनावर शरसंधान केले.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत थंडीची चाहुल लागली असून गारव्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. मात्र दिवसेंदिवस मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक घसरू लागल्याने चिंता वाढली आहे. बांधकामांमुळे हवेत उडणाऱ्या धुळीमुळे मुंबईमधील हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. धुळीमुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने विभाग कार्यालयांच्या स्तरावर विशेष पथके तैनात केली आहेत. मुंबईमधील हवा गुणवत्ता निर्देशांक खालावू लागल्यामुळे प्रदुषण रोखण्यासाठी विशेष पथकांनी ठोस उपाययोजना करणे अपेक्षित आहे. परंतु तसे होताना दिसत नाही, असा आरोप करीत रवी राजा यांनी या पथकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मुंबईत मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पांमधून होणारे प्रदुषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रकल्पस्थळी काही उपाययोजना करणे बंधनकारक केल्या आहेत. परंतु त्यांचे पालन होताना दिसत नाही. प्रदुषणास कारणीभूत ठरणारे पुनर्विकास प्रकल्प आणि संबंधित विकासकांविरोधात महापालिका ठोस कारवाई करणार का, असा खोचक सवाल त्यांनी केला. ठिकठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांमुळे मुंबईत धुळीचे साम्राज्य पसरत असून नागरिक श्वसनाच्या आणि अन्य आजारांनी त्रस्त आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेने यासंदर्भात संबंधितांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
