मुंबईः मुंबई विमानतळावरील विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. विमानतळ प्राधिकरणाने तात्काळ याबाबतची माहिती सर्व यंत्रणांना दिल्यानंतर विमानाची तपासणी करण्यात आली. पण विमानात काहीही संशयास्पद सापडले नाही. याप्रकरणी धमकीचा दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. त्यावेळी एका संशयीताला अंधेरी परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास धमकीचा दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज, विमानतळ, मुंबई हे बॉम्बस्फोट करून उडविणार असल्याची धमकी दिली होती. सर्वत्र तपासणी केली असता कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. त्यावेळी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीला शोध घेतला असता तो व्यक्ती साकीनाका पोलीस ठाणेच्या परिसरात असल्याचे समजले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक काशीद व गुन्हे प्रकटीकरण पथक तेथे रवाना झाले. पण त्या व्यक्तीचा मोबाइल बंद असल्याचे निष्पन्न झाले. अखेर पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला. संशयीत व्यक्तीचे छायाचित्र व नाव प्राप्त केले. त्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने कपड्यांच्या छोट्या कारखान्यात काम करणारा संशयीत मनजीत कुमार गौतम (३५) याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी करून त्याला सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
धमक्यांचे सत्र सुरूच
गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून देशातील सर्वच विमानतळांवर, तसेच विमान कंपन्यांना धमक्यांचे संदेश व दूरध्वनी प्राप्त व्हायला सुरूवात झाली. ऑक्टोबरमधील पहिल्या पंधरवड्यात धमक्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली होती. बहुतांश संदेश समाज माध्यमांद्वारे पाठवण्यात आले असून विमान कंपन्या, स्थानिक पोलीस, विमानतळ प्राधिकरण यांना ई-मेल अथवा संदेश पाठवून धमक्या देण्यात आल्या आहेत. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात एकाच दिवसात ८५ नवीन धमक्या आल्या होत्या. तसेच त्यापूर्वी १५ दिवसांतच ७० हून अधिक धमकीचे संदेश प्राप्त झाले होते. प्रत्येक विमानांची व प्रवशांची सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करण्यात आली. तपासणीत सर्व धमक्या अथवा संदेश खोटे असल्याचे निष्पन्न झाले.
सुरक्षा यंत्रणांच्या कार्यपद्धतीत बदल
धमक्यांच्या संदेशांमुळे विमानतळावरील सुरक्षा अधिक आव्हानात्मक व गुंतागुंतीची बनली आहे. धमक्यांसाठी विशेषतः समाजमाध्यमांचा वापर होत असल्यामुळे आता विमानतळ सुरक्षा यंत्रणांनी या धमक्यांचे मूल्यमापन करताना बहुस्तरीय दृष्टिकोन अवलंबण्याचा, तसेच धमकीच्या विश्वासार्हतेची व गंभीरतेची खात्री करण्यासाठी विविध घटकांचा विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी धमकीला ‘विशिष्ट’ किंवा ‘अविशिष्ट’ म्हणून वर्गीकृत करण्यापूर्वी, तिच्या माहितीच्या स्रोताची विश्वासार्हता विचारात घेण्याच्या सूचना सुरक्षा रक्षकांना करण्यात आल्या आहेत. गेल्यावर्षी सुरक्षा यंत्रणांनी कार्यप्रणालीत अनेक बदल केले आहेत.