मुंबईः सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाई दुबईला जाणाऱ्या प्रवाशाकडून परदेशी चलन व मौल्यवान हिरे जप्त करण्यात आले. आरोपींकडून जप्त करण्यात आललेल्या हिऱ्यांची किंमत एक कोटी ७० लाख रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.
मुंबई सीमाशुल्क विभाग-३ च्या अधिकाऱ्यांना संशयीत प्रवासी परदेशी चलन व हिरे दुबईला घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे मंगळवारी दुबईला जाणाऱ्या एका भारतीय प्रवाशाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडवून तपासणी करण्यात आली. हा प्रवासी नामांकीत कंपनीच्या विमानाने दुबईला रवाना होणार होता. सदर प्रवाशाची झडती आणि बॅगेची तपासणी केली असता त्याच्याकडे ५० सौदी रियाल (किंमत ११ लाख १५ हजार रुपये ) आणि कृत्रिम हिरे (किंमत ४६ लाख २२ हजार ४५० रुपये), तसेच नैसर्गिक हिरे (किंमत एक कोटी २३ लाख ७२ हजार ४५० रुपये) असा एकूण एक कोटी ७० लाख रुपयांचा मुद्देमाल सापडला.
तपासणीत आरोपीकडील काळा रंगाच्या बॅगेत सौदी रियाल सापडले. तर आरोपींने हिरे तीन पाकिटांमध्ये लपवले होते. आरोपीने ते पाकिट अंगावर चिकटवले होते. या प्रकरणी सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.