मुंबई : मुंबईत मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर पुढील काही तासांसाठी कायम राहणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पालघरमध्ये अतिवृष्टीचा तर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याचबरोबर विदर्भातही पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत पाऊस पडत आहे. मुंबई शहर आणि उपनगरात शनिवारी पहाटेपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली. उपनगरांमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. विशेषतः बोरिवली, कांदिवली ,दहिसर या भागात. पावसाचा जोर पुढील काही तास राहीला, तर सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प होईल असा अंदाज आहे. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
पाऊस सक्रिय होण्याचे कारण
वायव्य बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राने शुक्रवारी सकाळी पश्चिम बंगालजवळ किनारपट्टी ओलांडली. पुढील दोन दिवस ओडिशा, झारखंड, मध्य प्रदेशकडे वाटचाल करताना कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होणार आहे. कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात शनिवारी सर्वदूर पावसाबरोबरच मुसळधार सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग, तसेच मुंबई, ठाणे या भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
समुद्राला आज मोठी भरती
समुद्राला शनिवारी मोठी भरती येणार आहे. यावेळी समुद्रात साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत. भरतीच्या वेळी समुद्रकिनारी जाणे टाळावे, तसेच यासंदर्भात प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. समुद्राला शनिवारी सर्वात मोठी भरती येणार असून ४.६७ मीटर इतक्या उंचीच्या लाटा उसळणार आहेत.
रविवारनंतर जोर कमी
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात रविवारी पावसाचा जोर कमी होणार आहे. तर, सोमवारपासून कोकण, विदर्भातील पावसाचा जोर कमी होणार आहे.
आज पावसाचा अंदाज कुठे
अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट)
पालघर, पुणे घाट परिसर, चंद्रपूर, गोंदिया
अतिमुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, भंडारा, गडचिरोली, नागपूर, वर्धा
विजांसह पावसाचा अंदाज (यलो अलर्ट)
धुळे, नंदुरबार, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ
२६ जुलै २००५ आज वीस वर्षे…
मुंबईत २६ जुलै २००५ रोजी २४ तासांत ९४४ मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईत पावसामुळे हाहाकार उडाला होता. पाऊस एवढा प्रचंड होता की, मुंबईतील वाहतूक सेवा ठप्प झाली होती. घरे, दुकाने, रस्ते पाण्याखाली गेले होते. अनेक नागरिक कार्यालये, शाळा, रेल्वेमध्ये अडकून पडले होते. काही नागरिकांना घरी पोहोचण्यासाठी तब्बल २४ ते ३० तास लागले होते.