मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील एका कनिष्ठ पर्यवेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (anti corruption bureau) ८ हजार रुपयांची लाच घेताना पकडले. आजारी असलेल्या एका सफाई कामगाराकडून लाच स्वीकारताना त्याला पकडण्यात आले होते.
मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील एका सफाई कर्मचाऱ्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या सफाई कामगाराला पाठदुखीचा त्रास आहे. कुर्ला येथील एल वॉर्ड मध्ये तो रस्ते झाडण्याचे काम करतो. पाठदुखीवर तो नायर रुग्णालयात तो उपचार घेत आहे. डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे.
लाच मागण्यासाठी अशी ऑफर….
त्यामुळे तक्रारदार कामगाराने १६ सप्टेंबरला एल वॉर्ड येथील कनिष्ठ पर्यवेक्षक सुरेश मारुती सुरकुळे यांची भेट येवून त्यांना पाठदुखीचा त्रास असल्याचे सांगितले. तसेच आपल्यासोबत दुसरा एक कामगार देण्याची व ठराविक रोड देण्याबाबत विनंती केली. तेव्हा सुरकुळे म्हणाले की, दर महिन्याला ७,००० रुपये दे आणि घरी बसून नोकरी कर किंवा एकदाच १५,००० रुपये दे आणि फिक्स रोड घे असे सांगून लाचेची मागणी केली. त्यावर यां सफाई कामगारांने १९ सप्टेंबरला वरळी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
आजारी कामगारालाही सोडले नाही…
एसीबीने तक्रारीची चौकशी करून सापळा रचला आणि सुरेश सुरकुळे यांना ८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना शुक्रवारी २० सप्टेंबर संध्याकाळी पकडले. या प्रकरणी सुरेश सुरकुळे यांच्यावर भ्रष्टाचार निवारण कायदा १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतःच्या आजारी कर्मचाऱ्यांकडून लाच घेण्याचा प्रकार उघड झाल्याने पालिकेच्या घनकचरा विभागात भ्रष्टाचार किती बोकाळला आहे त्याचीच प्रचिती आली आहे.
ही कारवाई अतिरिक्त पोलिस अधीक्षक संदीप दिवाण, अतिरिक्त पोलिस उपअधीक्षक अनिल घेरडीकर, सहाय्यक पोलिस उपायुक्त राजेंद्र सांगळे, सहाय्यक पोलिस उपायुक्त अजित सुले आणि पोलिस निरीक्षक मोहन जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
नागरिकांना आवाहन….
दरम्यान, भ्रष्टाचारसंबंधी काही माहिती असा अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बृहन्मुंबई विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपतप्रतिबंधक विभाग आणि बृहन्मुंबई विभागाने केले आहे.
तक्रार करण्यासाठी..
संपर्क: लाचलुचपत प्रतिबंधकविभाग, बृहन्मुंबई विभाग, ९१, सरपोचखानवाला मार्ग, वरळी, मुंबई.
- टोलफ्री क्र. १०६४
- दूरध्वनी क्र. ०२२-२४९२१२१२
- फॅक्स क्र. ०२२-२४९२२६१८
- व्हॉट्सअप क्र. ८८२८२४१०६४