मुंबई : ॲन्टॉप हिल येथे घरकाम करणाऱ्या २७ वर्षीय तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही मुळची दार्जिलिंगमधील रहिवासी होती. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र घरमालकाचे दागिने गायब असल्याने तिच्यावर आळ घेण्यात आला होता. त्या नैराश्यात तिने हे टोकाचे पाऊस उचलल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ॲन्टॉप हिल येथील एका आलिशान इमारतीत वास्तव्यास असलेल्या वृद्धाच्या घरात ती काम करीत होती. मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास घराच्या गॅलरीत तिचा मृतदेह आढळला. तिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी ॲन्टॉप हिल पोलिसांनी अपमृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. तिच्या आत्महत्ये मागचे नेमके गूढ अद्याप स्पष्ट झालेले नसून याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.
चोरीचा संशय घेतल्याने आत्महत्या ?
ही तरुणी गेल्या दोन वर्षांपासून गृहसेविका म्हणून काम करीत होती. घर मालकाचे १० लाखांचे दागिने गायब झाले होते. ते दागिने चोरल्याचा संशय या तरुणीवर घेण्यात आला होता. मात्र या चोरीबाबत घरमालकाने कुठेही तक्रार केली नव्हती. आपल्यावर संशय घेतल्याने तरुणीने आत्महत्या केली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी आम्ही सर्व शक्यता तपासत आहोत, असे ॲन्टॉप हिल पोलिसांनी सांगितले.
