मुंबई : बेस्टच्या बस वाहकांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले असून बेस्टचे बस वाहक असुरक्षित बनले आहेत. एक प्रवासी आणि त्याच्या मित्राने अलिकडेच एका बेस्ट बस वाहक बाळू सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सूर्यवंशी यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. बस वाहकावर हल्ला करणारा प्रवासी आणि त्याच्या मित्रावर कडक कारवाई करावी, अशी मागणी दि बीईएसटी वर्कर्स युनियनने केली आहे.
बेस्ट उपक्रमाच्या वाहक, चालकांवर प्रवाशांकडून वारंवार हल्ले होत आहेत. आणिक आगारातील बस वाहक सूर्यवंशी बेस्ट मार्ग क्रमांक ३६७ (एसी) वर ११ जून रोजी कार्यरत होते. यावेळी बस कुर्ला बस स्थानक पूर्व येथून गडकरी खाण येथे जात असताना एका प्रवाशाने सूर्यवंशी यांच्याबरोबर हुज्जत घातली. स्वस्तीक चेंबर बस थांब्यावर हा प्रवासी उतरला आणि त्याने मित्रांला सोबत घेऊन रिक्षाने बसचा पाठलाग केला. गडकरी खाण बस थांबा येण्यापूर्वी त्याने बसमध्ये प्रवेश केला आणि सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेत बस वाहकाच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यामुळे रक्तस्त्राव झाला. प्रवासी आणि त्याचा मित्र त्वरित बसमधून उतरून पळून गेले. बस चालकाने वाहकाला त्वरित रुग्णालयात नेले.
बसमधील सीसी टीव्हीची तपासणी केली असता ते बंद असल्याचे निदर्शनास आले. मात्र, स्वस्तिक चेंबर येथील बस थांब्याजवळील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाद्वारे हल्लेखारांचा शोध घ्यावा आणि त्यांच्याविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी दि बीईएसटी वर्कर्स युनियनने केली आहे.
यापूर्वी बेस्ट उपक्रमाच्या वाहक आणि चालकांवर प्रवाशांनी केलेल्या हल्ल्यांबाबत प्रशासनाला पत्र पाठवले आहे. आजघडीला बस वाहक व चालक कर्तव्यावर असताना प्रवाशांकडून हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, आतापर्यंत कोणत्याही हल्लेखोरांविरूद्ध बेस्ट प्रशासनाने कडक कारवाई केलेली नाही. शिवाय बसवाहक व चालकांना कोणतेही संरक्षण देण्यात आलेले नाही.
बेस्टच्या वाहक आणि चालकांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी. कर्तव्यावर असलेले बस वाहक व चालकांना संरक्षण देण्याबाबत नियोजन करावे, अशी मागणी दि बीईएसटी वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी केली. यासंदर्भात बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक, बेस्ट वाहतूक शाखेचे मुख्य व्यवस्थापक आणि चेंबूर विभागाच्या पोलीस उपायुक्तांना पत्र पाठवण्यात आले आहे.