बुलढाण्यात झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाने मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आज (१ जुलै) मुंबईत होणारे भाजपा आणि महायुतीचे ‘आक्रोश आंदोलन’ आज न करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली.

आशिष शेलार म्हणाले, “बुलढाण्यातील अत्यंत वेदना देणाऱ्या अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. दु:खाचा डोंगर कोसळेल्या कुटुंबासोबत आमच्याही सहवेदना! स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांनी सुध्दा शोकभावना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घटनास्थळी पोहचत आहेत.”

हेही वाचा : समृद्धी महामार्गावरील बस अपघातात २५ जणांचा मृत्यू, संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले, “तो शापित महामार्ग, कारण…”

“…म्हणून आज ‘आक्रोश आंदोलन’ न करण्याचा निर्णय”

“या संपूर्ण घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आज होणारे भाजपा आणि महायुतीचे ‘आक्रोश आंदोलन’ आज न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आजचा दिवस दुःखाचा आहे, आज आम्ही काही बोलणार नाही, पण मुंबईकरांना लुटणाऱ्यांकडे हिशेब मात्र यापुढे ही मागतच राहू,” असं म्हणत आशिष शेलार यांनी ठाकरे गटाला लक्ष्य केलं.

बुलढाण्यात नेमकं काय घडलं?

प्रवासी बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथील प्रवासी होती. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस होती. बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि बसने पेट घेतला. या घटनेत २५ प्रवाशांचा मृत्यू झाला.

हेही वाचा : लोकजागर : मृत्यूचा ‘समृद्ध’ महामार्ग!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विदर्भ ट्रॅव्हल्सची एमएच २९ बीई १८१९ क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. ३० जूनला नागपूरहून संध्याकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. १ जुलै च्या रात्री १.२२ मिनिटांनी धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली. त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवासी बस पेटली आणि हा अपघात झाला.