मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनाने कितीही खबरदारी घेतली तरी नालेसफाईच्या कामात यंदाही घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. नालेसफाईच्या गाळाचे ‘एआय’ तंत्रज्ञानाने केलेल्या विश्लेषणात तब्बल ४० टक्के प्रकरणात फेरफार झाल्याचे उघड झाल्याची धक्कादायक माहिती शुक्रवारी उपनगरचे पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांनी नालेसफाई पाहणी दौऱ्यात उघड झाली. त्यामुळे पालिका आयुक्तांनी तातडीने नालेसफाईच्या नोंदीचे विश्लेषण करावे आणि कंत्राटदाराकडून १०० टक्के अपेक्षित काम करून घ्यावे, असे निर्देश शेलार यांनी दिले.
पावसाळ्यात मुंबईत पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते. नालेसफाईच्या कामात कंत्राटदारांना कोणतीही चलाखी करता येऊ नये म्हणून यंदा मुंबई महापालिकेने एआय या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. मात्र तरीही नालेसफाईचा गाळ काढून वाहून नेण्यात कंत्राटदारांनी चलाखी केल्याचे उघड झाले आहे. मुंबई उपनगरात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची ॲड. आशिष शेलार यांनी गुरुवारपासून पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. घाटकोपर बस डेपो शेजारी असलेल्या लक्ष्मी नगर नाल्यापासून शुक्रवारी सकाळी पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ए.पी. आय नाला, उषा नगर नाला, माहुल नाला, माहुल खाडी परिसर आणि खारु खाडी येथील कामाची पाहणी केली.
या वेळी आमदार मिहिर कोटेचा, मुंबई महापालिकेतील माजी गटनेते भालचंद्र शिरसाट, प्रभाकर शिंदे, मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजपाचे पदाधिकारी विनायक कामत, माजी नगरसेविका रितू तावडे, संबंधित विभागाचे अधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. मुंबईतील नालेसफाईमध्ये उपसण्यात येणाऱ्या गाळाचे मापन हे तंत्रज्ञानाच्या मदतीने व्हावे अशी मागणी गेली अनेक वर्षे आशिष शेलार करीत होते.. शुक्रवारच्या पाहणीच्या वेळी त्यांनी याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली. तेव्हा यंदा एआयच्या गाळ मोजणी व देखरेखीच्या कामांना सुरुवात झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच कशा पद्धतीने हे काम केले जाते याची विचारणा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी काही चित्रफिती दाखवल्या. या बाबतीत अधिक माहिती घेतल्यानंतर प्रत्येक वाहनातून वाहून नेलेला गाळ टाकण्यात येतो त्याची चित्रफित तयार करण्यात येते. त्याला एआयच्या माध्यमातून स्कॅन केले जाते.
१७ हजार गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये फेरफार
नालेसफाईचा गाळ वाहून नेण्यासाठी ४० हजारांहून अधिक फेऱ्या झाल्या असून त्यातील १७ हजार गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये फेरफार सापडला आहे. गाळाचे प्रमाण प्रत्यक्षापेक्षा जास्त दाखवणे, गाळ कमी दाखवणे, गाळामध्ये राडारोडा भरणे अशा प्रकारचे हे फेरफार आहेत. गाळ अजूनही नाल्यातच असून फेरफार करून कंत्राटदार चलाखी करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे फेरफार आणि कंत्राटदारांची देयकांचे विश्लेषण करा आणि कंत्राटदाराकडून १०० टक्के अपेक्षित काम करून घ्या, असे निर्देश शेलार यांनी यावेळी पालिका प्रशासनाला दिले. याबाबत महानगरपालिका आयुक्तांकडे पाठपुरावा करणार असल्याचेही ते म्हणाले.