मुंबई : लहान वयातच रक्ताशी संबधित कर्करोग झालेल्या मुलांना अस्थिमज्जा प्रत्यारोपण (बोन मॅरो ट्रान्सप्लांट) हा एकमेव पर्याय असतो. मुंबई महानगरपालिकेच्या शीव रुग्णालयाच्या धारावीतील शहर आरोग्य केंद्रामध्ये (छोटा शीव) प्रत्येक महिन्याला दोन रुग्णांवर अस्थिमज्जा प्रत्यारोपण करण्यात येते. मात्र आता याचा विस्तार करण्यात येणार असून, दर महिन्याला किमान १२ रुग्णांवर प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. हे नवे केंद्र १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

शीव रुग्णालयाच्या धारावी येथील केंद्रांमध्ये अस्थिमज्जा प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध आहे. मात्र या केंद्रांमध्ये महिन्याला फक्त दोन मुलांवरच प्रत्यारोपण करण्यात येत होते. त्या तुलनेमध्ये रुग्णालयाकडे रुग्णांची भलीमोठी प्रतीक्षा यादी आहे. त्यामुळे अधिकाधिक मुलांना याचा लाभ व्हावा यासाठी शीव रुग्णालयाने या केंद्राचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोल इंडिया आणि सिप्ला या दोन कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून या केंद्राचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. केंद्राच्या बांधकामासाठी ५ कोटी रुपये निधी उपलब्ध करण्यात आला असून, केंद्रामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचा पुढील १० वर्षांमध्ये येणारा खर्चही या कंपन्या उचलणार आहे. रुग्णालयात दर महिन्याला सरासरी २ म्हणजेच वर्षाला २४ अस्थिमज्जा प्रत्यारोपण केले जातात, परंतु केंद्राचे विस्तारीकरण झाल्यानंतर ही संख्या दरवर्षी सुमारे १४४ पर्यंत वाढणार आहे. यामुळे रुग्णांची प्रतीक्षा यादी कमी होऊन अधिक मुलांना जीवनरक्षक उपचार मिळतील, अशी माहिती शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.

अन्य रुग्णालयांवरील भार कमी होईल

मर्यादित सुविधांमुळे अनेक मुलांना वाडिया रुग्णालय, टाटा मेमोरियल रुग्णालय आणि बोरिवली येथील महानगरपालिकेच्या बीएमटी केंद्रांमध्ये उपचारासाठी पाठविले जाते. मात्र या रुग्णालयांमध्ये अस्थिमज्जा प्रत्यारोपणासाठी भलीमोठी प्रतीक्षा यादी असते. या नवीन केंद्रामुळे ही प्रतीक्षा यादी कमी होण्यास मदत होईल.

गरीब कुटुंबांना मोठा दिलासा

गरीब कुटुंबातील मुलांना या केंद्रामुळे दिलासा मिळणार आहे. खासगी रुग्णालयामध्ये अस्थिमज्जा प्रत्यारोपणसाठी २५ ते ३० लाख रुपये खर्च येतो. हा खर्च सर्वसामान्य कुटुंबाच्या आवाक्या बाहेर आहे. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयामध्ये उपचार परवडत नाही. २०१५ पासून रुग्णालयात १०४ मुलांचे अस्थिमज्जा प्रत्यारोपण यशस्वीरित्या करण्यात आल्याची माहिती शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता मोहन जोशी यांनी दिली.

५० पेक्षा गंभीर आजारांसाठी ही उपचारपद्धती लाभदायक

अस्थिमज्जा प्रत्यारोपण हे ५० पेक्षा जास्त प्रकारच्या गंभीर आजार असलेल्या रुग्णांवर करण्यात येते. यामध्ये ल्युकेमिया (रक्त कर्करोग), सिकलसेल आणि थॅलेसेमिया, तसेच अप्लास्टिक ॲनिमिया आणि मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये अनुवांशिक मेंदूचे विकार यांचा समावेश आहे. भावंडे आणि पालक हे मुलांना अस्थिमज्जा दान करू शकतात. अस्थिमज्जा प्रत्यारोपण ही एक अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया असून, मुलांसाठी जीवनरक्षक ठरते. त्यात केमोथेरपीद्वारे रोगग्रस्त अस्थिमज्जा काढून निरोगी पेशींचे प्रत्यारोपण करण्यात येते.