मुंबई : पश्चिम उपनगरांतील रसिक प्रेक्षकांची प्रतीक्षा अखेर संपली असून मुंबई महानगरपालिकेच्या बोरिवली येथील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्य मंदिर डागडुजीनंतर आता पुन्हा सुरू होणार आहे. सध्या नाट्य मंदिराच्या डागडुजीचे काम अंतिम टप्प्यात असून १ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता ‘संगीत देवभाबळी’ या व्यावसायिक नाटकाच्या प्रयोगाने मुख्य नाट्यगृहाचा पडदा पुन्हा उघडणार आहे. तसेच विविध नाट्यनिर्मात्यांना जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरच्या तिमाही तारखांचे वाटपही करण्यात आल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा व मनोरंजन विभागाने दिली.

मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेले बोरिवली येथील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्य मंदिरातील मुख्य नाट्यगृह डागडुजीसाठी १ एप्रिल ते १५ जून या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र नाटक, बालनाट्ये यांसह इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमांसाठी सुगीचा काळ असलेल्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे नाट्यनिर्माते व प्रेक्षकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले. तसेच पश्चिम उपनगरात, विशेषत: कांदिवली आणि बोरिवली परिसरात इतर नाट्यगृह नसल्यामुळे येथील रसिक प्रेक्षकांना दीड ते दोन तासांचा प्रवास करून शहरातील नाट्यगृहात जावे लागत होते. मात्र आता हे नाट्यगृह पुन्हा सुरू होत आहे. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्य मंदिराच्या डागडुजीचे काम नियोजित वेळेत पूर्ण झाले आहे. यामुळे कांदिवली – बोरिवली तसेच वसई – विरारमधील रसिकप्रेक्षकांना दिलासा मिळणार आहे. हे काम दिलेल्या वेळेत पूर्ण झाले आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. डागडुजीनंतर नाट्यगृह सुरू होत असताना पहिला प्रयोग करण्याची संधी आम्हाला दिल्याबद्दल नाट्यगृह व्यवस्थापनाचे आभार. तरी रसिकप्रेक्षकांनी ‘संगीत देवभाबळी’ व इतर मराठी नाटके पाहण्यासाठी बहुसंख्येने हजेरी लावावी’, असे नाट्यनिर्माते प्रसाद कांबळी यांनी सांगितले.

ज्येष्ठ नाट्यनिर्माते दिलीप जाधव म्हणाले, ‘मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व नाट्यगृह व्यवस्थापन व्यवस्थित लक्ष घालून हे काम वेळेत पूर्ण करीत आहेत. यामुळे पश्चिम उपनगरातील विशेषतः गोरेगाव ते बोरिवली परिसरातील प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून नाटनिर्मात्यांनाही दिलासा मिळाला आहे’.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवीन खुर्च्या, कलाकार व तंत्रज्ञांच्या कक्षांना नवा साज डागडुजीच्या कामाअंतर्गत मुख्य नाट्यगृहातील छत गळतीमुक्त करण्यात आले असून संपूर्णतः नवीन खुर्च्या बसविण्यात आल्या आहेत. या खुर्च्या आरामदायी आहेत. तसेच नवीन फरशा लावून कलाकार व तंत्रज्ञांच्या कक्षाची दुरुस्ती आणि त्या ठिकाणच्या बाकांना नवीन साज चढविण्यात आला आहे. एकूणच नाट्यगृहाच्या परिसराची डागडुजी करून रंगकाम, नवीन प्रकाशयोजना व विद्युत यंत्रणेत बदल करण्यात आले आहेत.