मुंबई : करोनामुळे रुग्ण दगावल्याच्या घटना समोर येत असतानाच रविवारी मात्र मुंबईकरांच्या दृष्टीने दिलासा देणारी घटना घडली. मुंबईत रविवारी एकाही करोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही. २६ मार्च २०२० ला मुंबईत एकही करोना रुग्ण दगावला नव्हता. मात्र नवीन ३६७ रुग्णांची नोंद झाली असून मुंबईतील एकूण करोना रुग्णांची संख्या सात लाख ५० हजार ८०८ पर्यंत पोहोचली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी मुंबईत २८ हजार ६९७ चाचण्या करण्यात आल्या. यात ३६७ नवीन रुग्ण  आढळले, तर ५१८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत मुंबईत सात लाख २७ हजार ८४ रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्कय़ांवर गेला आहे. आतापर्यंत १६ हजार १८० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मुंबईतील मृत्यूंमध्ये मोठी वाढ झाली होती. मात्र लाट ओसरल्यावर मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी होत गेली. मागील काही दिवसांपासून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दोन ते सहाच्या दरम्यान आहे. १० ऑक्टोबरला ६ जण, ११ ऑक्टोबरला ४ जण, १२ ऑक्टोबरला २, तर १५ ऑक्टोबरला ५ जणांचा मृत्यू करोनामुळे झाला होता. रविवारी मुंबईत एकही मृत्यू झालेला नाही. २६ मार्च २०२० ला मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झाली होती, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. तर लसीकरण आणि मृत्यू रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे हे फलित असल्याचे म्हटले जात आहे.

रुग्णवाढीचा दर स्थिर

मागील आठवडय़ात रुग्णवाढीचा दर ७ टक्कय़ांवर गेला होता. यात घट होऊन हा दर १० ते १७ ऑक्टोबरदरम्यान ६ टक्कय़ांवर स्थिर आहे. तर रुग्णदुपटीचा दर १,२१४ दिवसांवर गेला आहे. सध्या मुंबईत ५,०३० सक्रिय रुग्ण असून ५० इमारती प्रतिबंधित आहेत. तर एकही झोपडपट्टी प्रतिबंधित नाही.

मुंबईत गेल्या २४ तासांत एकाही करोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. ही सर्व मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब आहे.

इक्बाल सिंह चहल, पालिका आयुक्त 

ठाणे जिल्ह्य़ात १८२ जणांना संसर्ग

ठाणे  : ठाणे जिल्ह्यात रविवारी १८२ करोना रुग्ण आढळले, तर एकाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील १८२ करोना रुग्णांपैकी ठाणे ५४, कल्याण-डोंबिवली ४३, नवी मुंबई ४७, उल्हासनगर १४, मिरा भाईंदर १२, अंबरनाथ पाच, बदलापूर पाच आणि ठाणे ग्रामीण क्षेत्रात दोन करोना रुग्ण आढळून आले. तर कल्याण-डोंबिवली क्षेत्रातील एकाचा मृत्यू झाला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai city reports 367 covid 19 cases in last 24 hours zws
First published on: 18-10-2021 at 03:34 IST