मुंबई : मुंबई महापालिकेला १५ टक्के एकात्मिक गृहनिर्माण आणि अन्य एका योजनेअंतर्गत ४२६ घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. म्हाडाच्या धर्तीवर संगणकीय सोडतीद्वारे या घरांची सोडत काढण्यात येणार असून यासाठी आठवड्याभरात जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. पहिल्यांदाच पालिकेकडून सोडतीद्वारे घरांची विक्री केली जाणार आहे. मात्र या सोडतीतील घरांच्या किंमती सर्वसामान्यांना भोवळ आणणाऱ्या आहेत.

भायखळ्यातील अत्यल्प उत्पन्न गटातील २७० चौ. फुटाच्या घराची विक्री किंमत एक कोटी सात लाख रुपये आहे. तर दुसरीकडे या घरांसाठीच्या अर्जदारांना वार्षिक कौटुंबिक (पती-पत्नीचे उत्पन्न) उत्पन्न मर्यादा सहा लाखांपर्यंत आहे. वार्षिक उत्पन्न मर्यादा आणि घरांच्या किंमतीमध्ये मोठी तफावत असल्याने या घरांना प्रतिसाद मिळणार का ? मिळाला तर विजेत्यांना इतक्या मोठ्या रक्कमेचे गृहकर्ज मिळणार का? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

महापालिकेला १५ टक्के एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत १८६ घरे, तर विकास नियंत्रण नियमावली २०३४ च्या ३३ (२०) (ब) अंतर्गत २४० घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. ही घरे अत्यल्प आणि अल्प गटातील असून अत्यल्प गटातील घरे २७० चौ. फुटांची, तर अल्प गटातील घरे ५२८ चौ.फुटांची आहेत. या घरांच्या सोडतीसाठी आठवड्याभरात जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून दिवाळीनंतर सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.

दरम्यान, या घरांच्या विक्रीसाठी म्हाडाच्या सोडतीचे सर्व नियम लागू करण्यात आले आहेत. तर सोडतपूर्व प्रक्रिया, सोडत आणि सोडतीनंतरची घरांच्या वितरणाची प्रक्रियाही म्हाडाच्या धर्तीवर संगणकीय पद्धतीने केली जाणार आहे. यासाठी म्हाडाप्रमाणे पालिकेने संगणकीय प्रणाली तयार केली असून या प्रणालीची चाचणी सध्या सुरू असल्याची माहिती पालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली. पहिल्यांदाच पालिकेकडून मुंबईकरांना सोडतीद्वारे घरे उपलब्ध करण्यात येणार आहेत, दिवाळीत यासाठी अर्ज भरता येणार आहे. मात्र या घरांच्या किंमती इच्छुकांना भोवळ आणणाऱ्या आहेत.

सोडतीतील घरांच्या किंमती ६० लाख ते १ कोटी ७ लाखांदरम्यान आहेत. यास अधिकाऱ्यानी दुजोरा दिला. भायखळ्यातील अत्यल्प गटातील २७० चौ. फुटाच्या घराची किंमत एक कोटी ७ लाख रुपये आहे. तर दुसरीकडे या घरांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा सहा लाखांपर्यंत आहे. ५० हजारापर्यंत महिना उत्पन्न असणाऱ्या विजेत्याला या घरासाठी गृहकर्ज मिळण्यात अडचण येणार आहे. हे घर या गटाला कसे परवडणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

याविषयी अधिकाऱ्यांना विचारले असता किंमत निश्चितीच्या धोरणानुसारच या किंमती निश्चित करण्यात आल्या आहेत. त्या त्या भागातील शीघ्रगणक दर आणि त्यावर १० टक्के प्रशासकीय खर्च याप्रमाणे घरांच्या किंमती निश्चित करण्यात आल्या आहेत. भायखळ्यातील शीघ्रगणक दर ३० हजार रुपये चौ. फुटांपर्यंत आहेत. त्यामुळे भायखळ्यातील ४२ घरांच्या किंमती एक कोटीच्या वर गेल्याचेही त्यांनी सांगितले. पालिकेच्या सोडतीतील घरे अत्यंत महाग असल्याने आता या घरांना कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

कुठे घरे भायखळा (पश्चिम), कांदिवली (पूर्व), कांदिवली (पश्चिम), अंधेरी (पूर्व), जोगेश्वरी (पूर्व) गारेगाव (पश्चिम), दहिसर (पश्चिम), कांजूरमार्ग, भांडूप (पश्चिम)

पालिकेच्या सोडतीत ५९ टक्के घरे ही सर्वसाधारण गटासाठी राखीव असणार असून पालिकेतील कर्मचाऱ्यांसाठीही काही घरे राखीव असणार आहे. तर सामाजिक आरक्षणासह पत्रकार, कलाकार आणि इतर आरक्षणही या सोडतीसाठी लागू आहे. राज्य सरकार कर्मचारी, केंद्र सरकारी कर्मचारी या प्रवर्गासह एक प्रवर्ग मात्र सोडतीतून वगळण्यात आला आहे.

नियमानुसार शीघ्रगणक आणि त्यावर १० टक्के याप्रमाणे किंमती निश्चित करण्यात आल्या आहेत. घरांना प्रतिसाद मिळाला नाही तर पुढे योग्य तो विचार करता येईल. – भूषण गगराणी, पालिका आयुक्त