मुंबई : राज्यात जागतिक वसुंधरा दिनापासून (२२ एप्रिल) ते १ मे महाराष्ट्र दिन या सप्ताहात ‘पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा’ या पर्यावरण संवर्धन व जनजागृती अभियानाचे आयोजन केले जाणार आहे. या राज्यस्तरीय पर्यावरण संवर्धन जनजागृती अभियानाची सुरुवात मुंबईतील पवई तलाव येथे स्वच्छता व संवर्धन अभियानातून करण्यात येणार आहे.

पवई तलाव हा मुंबईतील एकमेव मोठा तलाव असून अनेक मुंबईकर व पर्यटकही तेथे पर्यटनासाठी हमखास भेट देत असतात. हा तलाव आता प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. जलाशयात जलपर्णी, गाळ आणि सांडपाण्यामुळे पाण्याची गुणवत्ता खालावली आहे. ही बाब लक्षात घेऊन पर्यावरण संवर्धन व जनजागृती अभियानाची सुरुवात २२ एप्रिल रोजी सकाळी ६:३० वाजता पवई तलावापासून करण्यात येणार आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मंत्री पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतून हे अभियान सुरू करण्यात येणार आहे.

या अभियानात पर्यावरणासाठी काम करणाऱ्या वनशक्ती, निसर्ग, प्रोजेक्ट राईस, पर्यावरण दक्षता मंच, न्यास, हेल्पिंग हँड्स आणि बुरानी ट्रस्ट या संस्था सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, खासदार संजय दिना पाटील, आमदार दिलीप लांडे, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे आणि विविध पर्यावरणप्रेमी सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व स्वयंसेवकही उपस्थित राहणार आहेत.पवई तलाव हा केवळ एक जलाशय नसून, तो मुंबईच्या इतिहासाचा आणि पर्यावरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

तलावाची स्थिती

तलावाच्या पाण्याची गुणवत्ता खालावली आहे. तलावात जलपर्णी आणि इतर वनस्पतींची वाढ झाली आहे. ज्यामुळे युट्रोफिकेशनची समस्या निर्माण झाली आहे.२००२ साली, राष्ट्रीय तलाव संरक्षण योजनेअंतर्गत पवई तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी एक प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पात जलपर्णी काढणे, जलशुद्धीकरण, आणि परिसराचे सौंदर्यीकरण यांचा समावेश होता. आयआयटी मुंबईच्या १९८० च्या बॅचनेही तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी योगदान दिले आहे.

जैवविविधता

पवई तलाव विविध पक्ष्यांच्या प्रजातींसाठी निवासस्थान आहे. येथे स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांचे वास्तव्य आहे, ज्यात काही दुर्मिळ आणि संकटग्रस्त प्रजातींचाही समावेश आहे, जसे की ओरिएंटल डार्टर आणि ब्लॅक-हेडेड आयबिस आदी.

मगरींचा अधिवास

पवई तलावात मगरींचा अधिवास आहे. अनेकदा मगरी तलावाच्या काही भागांत सहजपणे दिसतात. तसेच आयआयटी मुंबई परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात अनेकदा मगरी विहार करताना दिसल्या आहेत. विशेषतः पावसाळ्यात जेव्हा पाण्याची पातळी वाढते तेव्हा मगरी तलावाबाहेर येतानाही दिसतात.महानगरपालिकेने २०२२ मध्ये प्रथमच पवई तलावातील मगरींची गणना केली, ज्यामध्ये १८ मगरी आढळल्या होत्या. या मगरी प्रामुख्याने आयआयटी मुंबई आणि रेनिसंस हॉटेलच्या परिसरात दिसतात.

रासायनिक पदार्थांवर बंदी

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पवई तलावात जलपर्णी नष्ट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक पदार्थांवर बंदी घातली आहे, कारण हे रसायन मगरी आणि इतर जीवांसाठी हानिकारक ठरू शकते.