मुंबई : किनारी रस्ता आणि वांद्रे – वरळी सागरी सेतूला सांधणाली पहिली महाकाय तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) जोडण्यात मुंबई महानगरपालिकेला यश आले. महानगरपालिकेने हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता प्रकल्पांतर्गत आज शुक्रवार, २६ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी ही तुळई जोडण्यात आली. मध्यरात्री सुरू केलेल्या या कामाच्या वेळी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते.

खुल्या समुद्रात भरती-ओहोटीचा अंदाज घेऊन तुळईद्वारे या दोन मार्गांना जोडण्याचे नियोजनमहानगरपालिकेने हाती घेतले होते. भारतातील हा पहिलाच प्रयोग यशस्वी ठरल्याने महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

हेही वाचा : राज्यात हिवताप रुग्णांच्या मृत्यूमध्ये घट

पहाटे २ वाजल्यापासून सुरू झालेले हे काम पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी यशस्वीपणे पार पडले. या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी गगराणी यांनी मुंबई किनारी रस्ता प्रकल्प पथकाचे अभिनंदन केले.

एकूण १०.५८ किलोमीटर लांब असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील अतिशय आव्हानात्मक टप्पा म्हणजे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूची सांधणी. त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने अतिशय नियोजनबद्ध योजना तयार केली. या दोन्ही टोकांना सांधणारी पहिली तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) गुरुवारी २५ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता वांद्रे-वरळी सागरी सेतू जवळ आणली होती.

हेही वाचा : ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास; दोन वर्षांत १२६० घरांचा ताबा देण्याचे म्हाडाचे आश्वासन

संयम आणि कौशल्य पणाला लावणारी १ तास २५ मिनिटे

प्रवाहकीय हवामानानुसार अंदाज घेवून पहाटे २ वाजेपासून गर्डर स्थापनेची कार्यवाही सुरू करण्यात आली. त्यानंतर बार्जच्या मदतीने टप्प्याटप्प्याने तुळई मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या मधोमध आणली. सागरी लाटांचा आणि वाऱ्याच्या वेगाचा अंदाज घेत अभियंत्यांनी कौशल्य पणाला लावत सुयोग्य स्थितीत तळईला स्थिर केले. मुंबई किनारी रस्त्याच्या कडेला दोन आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाच्या कडेला दोन असे चार मेटींग युनिट तयार करण्यात आले आहेत. त्या मेटींग युनिटमध्ये तुळईचे चारही कोपऱ्यांना असलेले पांढऱ्या रंगाचे मेटींग कोन ठिक ३ वाजून २५ मिनिटांनी अचूकपणे बसविण्यात आले. चारही मेटींग कोन आणि मेटींग युनिटची सांगड बसताच उपस्थित अधिकारी, अभियंते आणि कामगारांनी ‘हिप हिप हुर्रे’ म्हणत आणि टाळ्यांचा गजरात मोहीम फत्ते झाल्याचा आनंद व्यक्त केला. त्यानंतर तुळई खाली असलेला रिकामा तराफा बाजूला करण्यात आला.

तुळईचा अंबाला ते मुंबई प्रवास

ही महाकाय तुळई वरळीकडून नरिमन पाईंट दिशेला जाणाऱ्या मार्गावर स्थापन करण्यात आली आहे. तुळई दोन हजार मेट्रीक टन वजनाची असून, १३६ मीटर लांब आणि १८ ते २१ मीटर रुंद आहे. अंबाला (हरियाणा) येथे या तुळईचे छोटछोटे सुटे भाग तयार करण्यात आले आहेत. तेथून तब्बल ५०० ट्रेलरच्या मदतीने हे सुटे भाग दाखल आले. सुटे भाग एकत्र जोडून नवी मुंबईतील न्हावा बंदरातून तराफाच्या मदतीने ही तुळई वरळी येथे आणली.

हेही वाचा : ‘अटल सेतू’ला वाहनचालकांचा थंडा प्रतिसाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुळईवर होणार सिमेंट क्राँक्रिटीकरण

मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूदरम्यान स्थापन करण्यात आलेल्या तुळईवर पुढील टप्प्यात सिमेंट क्राँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या तुळईला गंज चढू नये यासाठी सी-५ या जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तसेच अतिशय प्रगत वेल्डिंग तंत्रज्ञानाद्वारे तुळईचे सुटे भाग एकमेकांना जोडण्यात आले आहेत.