मुंबई : वाजत गाजत, उत्साहात निघालेल्या मिरवणुकीतून, देखण्या रथांवर आरूढ होऊन, अत्यंत कल्पकतेने साकारलेल्या मंडपांत श्रीगणेश विराजमान झाले आहेत. गणेशोत्सवाच्या आरंभामुळे संपूर्ण शहर चैतन्यात न्हाऊन निघाले आहे. एरवीही लकाकणारी मुंबई आकर्षक सजावट, देखावे, रोषणाईने आणखीच झळाळून निघाली आहे.

गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी मंगळवारी सकाळपासून ढोल-ताशांच्या गजरात आणि बँजोच्या तालावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या भव्य गणेशमूर्ती मंडपात विराजमान होत होत्या. अशाच आगमन मिरवणुका गेला आठवडाभर मुंबईकरांनी अनुभवल्या. मुंबईतील गिरगाव, लालबाग, परळ, लोअर परळ, दादर, विलेपार्ले, अंधेरी येथील जवळपास गल्लोगल्लीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांत आठवड्यापासून गणेशमूर्ती बसवण्यात आल्या आहेत. नामांकित गणेशमंडळांसमोर मंगळवार सायंकाळपासूनच भाविकांनी दर्शनाची रांग लावण्यास सुरूवात केली होती. गणरायाचा जयघोष करीत, घंटा, झांजा, टिपऱ्यांच्या नादात घरगुती गणेशमूर्तींचे रात्री उशीरापर्यंत आगमन सुरू होते. गणेशोत्सवासाठी एकत्र जमलेल्या कुटुंबांनी नटूनथटून गणेशमूर्ती घेण्यासाठी कार्यशाळांबाहेर गर्दी केली. बुधवारी दुपारपूर्वी गणेशाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त असल्याने मंगळवारीच गणेशमूर्ती घरी नेण्याकडे नागरिकांचा कल होता. अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमध्येही नागरिकांचा उत्साह कायम होता. मूर्ती जपून घरी नेण्याची शिकस्त दिसत होती. लहानमोठ्या रहिवासी संकुलांची सायंकाळ गणेशाच्या मिरवणुकांनी सजली होती.

बाजारपेठांमध्ये गर्दी

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येलाही पूजा व सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी मुंबईकरांनी लालबाग व दादरसह विविध ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये गर्दी केली. रविवारी पावसामुळे राहिलेली सजावट पूर्ण करण्यासाठी मंगळवारी सकाळपासून ग्राहकांनी साहित्य खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसले. पूजासाहित्याची दुकाने, फुले, फळांचे बाजार, मिठाईची दुकाने गजबजून गेली होती. मुंबईतून कोकणात जाणाऱ्या बहुसंख्य नागरिकांची रेल्वे स्थानक व बस स्थानकांवर गर्दी पाहायला मिळाली. मुंबईतील गणेशोत्सव ‘याची देही, याची डोळा’ अनुभवण्यासाठी विविध ठिकाणांहून नागरिक शहरात दाखल झाले आहेत.

कडेकोट पोलीस बंदोबस्त

गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरातील चौकाचौकात आणि मुख्य रस्त्यांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बहुसंख्येने वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.