लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत बहुमताचा आकडा पार केला आणि मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ढोल-ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करीत काँग्रेस कार्यकर्ते जल्लोष करीत होते. या विजयी यात्रेत बजरंगबलीच्या वेषात सहभागी झालेला तरूण सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला शनिवारी सकाळी सुरुवात झाली आणि सर्वांचीच उत्सूकता शिगेला पोहोचली होती. कर्नाटकातील विविध जिल्ह्यांमधील विधनसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आघाडी घेऊ लागले आणि निकालाबाबत उत्कंठा वाढत गेली. भाजपच्या उमेदवाराला धूळ चारून काँग्रेस उमेदवार विजयी होऊ लागले आणि मुंबईतील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले.

हेही वाचा… ‘मुंबई’ जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रामाणिक शहर

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्ते जमू लागले. गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करीत ढोल-ताशाच्या गजरात जल्लोष सुरू झाला. काही कार्यकर्ते मिठाई वाटून आनंद व्यक्त करीत होते. ‘काँगेस पक्षाचा विजय असो, जय बजरंगबली’ आदी घोषणा देत कार्यकर्त्यांनी सारा परिसर दणाणून सोडला. हातात सोनिया गांधी व राहुल गांधींच्या प्रतिमा, गळ्यात शेले, डोक्यावर टोपी आणि खांदयावर काँग्रेस पक्षाचे झेंडे घेऊन मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. दाक्षिणात्य वाद्य ताहवेल आणि नादस्वरमच्या तालावरही कार्यकर्ते थिरकत होते.

हेही वाचा… सेंट जॉर्जेस रुग्णालयातील रक्तशुद्धीकरण केंद्रासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखणार; सर्वसामान्यांना अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी प्रयत्न

सत्तेत आल्यानंतर पीएफआय, बजरंग दल अशा संघटनांवर कारवाई करण्याचे आश्वासन काँग्रेसने कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीतील जाहीरनाम्यात दिले आहे. त्यामुळे एक कार्यकर्ता चक्क गदा घेऊन बजरंगबलीच्या वेशात या मिरवणुकीत सहभागी झाला होता. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरण सिंग सप्रा, डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.