मुंबई : गेल्या आठवड्यापासून मुंबईत पावसाने उघडिप दिली आहे. परिणामी, मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागत आहे. मुंबईकर मंगळवारीही घामाच्या धारांनी हैराण झाले होते. दरम्यान, पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतले आहे. याचबरोबर तापमानातही मागील दोन – तीन दिवसांपासून वाढ झाली आहे. ही स्थिती आढवडाभर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
मुंबईकर सध्या उकाड्यामुळे हैराण झाले आहेत. वाढता उकाडा नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईच्या वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. मध्येच ढगाळ वातावरण, तर मध्येच उन्हाचा ताप. यामुळे मुंबईत उकाडा वाढला आहे. कडकडीत ऊन, असह्य उकाडा आणि घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण झाले आहेत. मुंबईत साधारण सोमवारपासून ही स्थिती आहे सोमवारीही तापमानात वाढ झाली होती. त्यानंतर मंगळवारीही परिस्थिती सारखीच होती. सकाळी १० नंतर कडक ऊन पडले होते.
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सध्या पावसाने उघडीप दिल्यामुळे उष्ण व दमट वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळ्यात पश्चिमेकडून येणारे वारे वेगवान असतात. त्यामुळे वातावरणात गारवा असतो. मात्र, सध्या मोसमी पावसाने उघडीप दिल्याने वाऱ्यांचा वेग मंदावला आहे. परिणामी, उष्ण व दमट वातावरणामुळे असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी ३१ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ येथे ३२.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथील तापमान २.२ अंश सेल्सिअसने अधिक नोंदले गेले. दोन्ही केंद्रावरील तापमान सोमवारच्या तुलनेत मंगळवारी अधिक होते.
आर्द्रतेचे प्रमाण अधिक
समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मुंबईकरांना घामाच्या धारा लागत आहेत. घामामुळे शरीरातील पाणी निघून जाते. त्यामुळे गळून गेल्यासारखे वाटणे, थकवा येणे अशा तक्रारी मुंबईकर करीत आहेत. अंगाची लाहीलाही करणारे ऊन आणि घामाच्या थरांनी मुंबईकर त्रस्त झाले आहेत.
पावसाची विश्रांती
मुंबईत पुढील तान – चार दिवस फारसा पाऊस पडणार नसल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे साधारण हा आठवडाभर तरी मुंबईकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा वाढेल. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने ओढ दिली आहे. याचबरोबर पुढचे काही दिवस पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये सरासरीइतका तरी पाऊस पडेल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जुलैमध्ये मुंबईत पावसाची तूट होती. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात १ ते ५ ऑगस्ट या कालावधीत ३ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ८.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.