मुंबई क्रिकेट संघटनेची (एमसीए) निवडणूक २० ऑक्टोबर रोजी होणार असून याच पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या गटाने एकत्र पॅनल उभं करण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीमधील मतदार प्रतिनिधींसोबत बुधवारी रात्री राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. शेलार यांनीच या बैठकीसंदर्भातील माहिती दिली. विशेष म्हणजे या वेळेस उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरही मंचावर उपस्थित होते. या सभेमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दलची माहिती एमसीएचे मतदार असणारे आमदार प्रताप सरनाईक यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
नक्की वाचा >> दीड वर्षांपूर्वीच ठाकरे कुटुंबाला लागलेली शिंदेंच्या बंडाची चाहूल? आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा; म्हणाले, “आमच्या घरात…”
मिलिंद नार्वेकर एकाच मंचावर बसल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे कुठेतरी राजकीय चर्चा झाली का? असा प्रश्न सरनाईक यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सरनाईक यांनी, “क्रिकेटचा आणि राजकारणाचा खरं तर कधीही काहीही संबंध येता कामा नये असं या बैठकीच्या माध्यमातून जाणवलं. खेळामध्ये आणि प्रामुख्याने क्रिकेटमध्ये राजकारण येऊ नये या मताचे सर्वजण होते. सर्वच जण होते यात मिलिंद नार्वेकर, अमोल काळेही होते. निवडणुकीला उभे राहणारे सर्व सदस्य होते. मात्र राजकारणाची काही चर्चा झाली नाही. चर्चा झाली ती केवळ क्रिकेटची,” असं सांगितलं.
नक्की वाचा >> ‘भाजपाची ढाल अन् गद्दारांची तलवार’ टीकेवरुन फडणवीस संतापले; ठाकरे गटाला लक्ष्य करत म्हणाले, “याहून मोठी गद्दारीच…”
या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय म्हणाले याबद्दलही सरनाईक यांनी माहिती दिली. “मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक २० तारखेला आहे. आहे. दोन ते तीन पॅनेल देखील उभे राहण्याची शक्यता आहे. पवार आणि शेलार गटातील काही एमसीएचे सदस्य या ठिकाणी एकत्र आले होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या सदस्यांना मार्गदर्शन केलं आहे. प्रामुख्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात हे सांगितलं की क्रिकेट कसं या राज्यात मोठं होईल आणि त्यासंदर्भातील कोणत्या सुविधा द्यायला हव्यात. याचसंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलं,” असं सरनाईक यांनी सांगितलं.
“क्रिकेटमध्ये राजाकरण येऊ नये. पण खेळाडूंबरोबर राजकीय क्षेत्रातील काही लोकांना संधी उपलब्ध करुन दिली तर निश्चितपणे क्रिकेटचा विकास होऊ शकेल,” असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. “वानखेडे असो, ब्रेबॉन असू द्या किंवा एमएमआर क्षेत्रातील मैदानांचा विकास होईल. एमएमआरमधील अनेक खेळाडूंना मुंबईपर्यंत यावं लागतं. क्रिकेटच्या सुविधा या ठिकाणी कशा उपलब्ध करता येतील याला प्राधान्य दिलं जाईल यासंदर्भातील सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केल्या,” असंही त्यांनी सांगितलं.
“राजकारणी आणि खेळाडू एकत्र आले तर अजून त्या खेळाचा अधिक चांगल्या पद्धतीने प्रचार होईल. आम्ही त्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. मी सुद्धा मागील अनेक वर्षांपासून मुंबई क्रिकेट असोसिएशनचा मतदार आहे. माझे सुद्धा क्रिकेटचे दोन क्लब आहेत. ओघाने माझा मुलगा सुद्धा या पॅनेलमध्ये उभा आहे म्हणून मी या ठिकाणी आलो आहे,” असंही सरनाईक यांनी सांगितलं.