मुंबई : महिलेसह तिच्या मुलीवरही लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका विकृत व्यक्तीला धारावी पोलिसांनी अटक केली. महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन आरोपीने तिच्याशी मैत्री करून शरीरसंबंध प्रस्थापित केले होते. मात्र महिलेने संबंध तोडताच तिची अश्लील छायाचित्रे प्रसारित केली आणि तिच्या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले.

फिर्यादी महिला ३२ वर्षांची असून ती आपल्या १३ वर्षांच्या मुलीसह राहते. तिची नोव्हेंबर २०२४ मध्ये २९ वर्षीय तरुणासोबत ओळख झाली. आर्थिक मदत करण्याच्या निमित्ताने तरुणाने पीडित महिलेशी जवळीक करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने तिला वेगवेगळी आश्वासने देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यानच्या काळात तरुणाची वर्तणूक चांगली नसल्याचे, तसेच त्याचे अन्य महिलांशी संबंध असल्याचे महिलेला समजले. त्यामुळे तिने तरुणासोबतचे सर्व संबंध तोडून टाकले. संबंध न ठेवल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी त्याने पीडित महिलेला दिली. मात्र महिलेने त्याला दाद दिली नाही.

पीडित महिलेने संबंध तोडल्यामुळे संतापलेल्या तरुणाने तिची अश्लील छायाचित्रे तिच्या नातेवाईकांना पाठवली. तसेच फिर्यादी महिलेच्या १३ वर्षीय मुलीवरही लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार पीडित महिलेला समजल्यानंतर तिने पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी तरुणाविरोधात बलात्कार, लैंगिक छळ केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५ (२), ७७, ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३५६ (२) अन्वये, तर अश्लील छायाचित्रे प्रसारित केल्याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (ई) आणि ६६ (ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याचबरोबर पीडितेच्या लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बालकांचे लैंगिक शौषण विरोधी कायद्यातील (पोक्सो) कलम ८ अन्वये गु्न्हाही दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पळून जाणाऱ्या तरुणाला शुक्रवारी रात्री पोलिसांनी शीव रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. तरुणाची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.