मुंबई : प्रेमसबंधातून एका २३ वर्षीय तरुणाची धारावीत हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले. या प्रकऱणी गुन्हे शाखा-५ च्या पथकाने आरोपीला अटक केली असून मृत तरुणाचे आरोपीच्या बहिणीशी प्रेसंबंध होते. त्याला विरोध असल्याने ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. धारावी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरमान शाह ( २३) धारावीतील पुनावाला चाळीत राहत होता.
अरमान धारावीच्या एका कपड्यांच्या कारखान्यात काम करत होता. त्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. मात्र या प्रेमसंबंधाला मुलीच्या कुटुंबियांचा विरोध होता. मुलीचा भाऊ प्रीतेश मिश्रा (२२) याने अनेकदा अरमानला बहिणीशी असलेले प्रेमसंंबंध तोडण्यास असे सांगितले होेते. तरीही अरमान त्याच्या बहिणीला भेटत होता.
कारखान्यात जाऊन हल्ला केला
आरोपी प्रितेश मिश्रा बुधवारी रात्री अरमान काम करत असलेल्या कारखान्यात गेला. बोलायचे आहे असे सांगून अरमानला बाहेर बोलावून घेतले. त्यानंतर प्रितेशने अरमानच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली आणि खिशातून चाकू काढून त्याच्यावर वार केले. गंभीर जखमी अवस्थेत अरमानला त्याच्या सहकाऱ्यांनी तत्काळ शीव रुग्णालयात हलवले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
गुन्हे शाखा ५ च्या पथकाने आरोपीला केली अटक
या घटनेनंतर धारावी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, गुन्हे शाखा कक्ष ५ ने या हत्या प्रकऱणाचा समांतर तपास सुरू केला होता. आरोपी प्रितेश मोबाइल वापरत नव्हता. पोलिसांनी तांत्रिक माहिती काढून त्याला धारावीच्या राजीव नगर परिसरातून गुरूवारी पहाटे अटक केली.