मुंबई – बॅंकॉकहून एका प्रवाशाने तस्करी करून आणलेले १६ दुर्मिळ प्रजातीचे साप सीमा शुल्क विभागाने जप्त केले आहे. याप्रकरणी एका प्रवाशावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
शुक्रवारी रात्री एक प्रवासी थायलंडच्या बॅंकॉकहून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला होता. विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्याला अडवून चौकशी केली. विचारपूस सुरू असताना तो प्रवासी अस्वस्थ झाला होता तसेच त्याच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. त्यामुळे त्याच्या सामानाची तपासणी करण्यात आली.
तपासणीअंती या प्रवाशाच्या सामानात दुर्मीळ प्रजातीचे एकूण १६ साप आढळले. त्यात २ गार्टर, ५ राईनोसोरस रॅट, १ अल्बिनो रॅट, २ केनियन सॅण्ड बोआ, १ कोस्टल बॅंडेड कॅलिफोर्निया किंग आणि ५ अल्बिनो होंडुरन मिल्क सापांचा समावेश आहे. हे सर्व साप जिवंत होते. त्याने ते सामानात लपवून आणले होते. पंचनामा करून तस्करी केलेले प्राणी जप्त करण्यात आले आहेत. या सापांची लाखो रुपयांना विक्री करण्यात येते.
या प्राण्यांची तस्करी केल्याप्रकरणी संबंधित प्रवाशाला सीमाशुल्क कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.