मुंबई : सायबर गुन्ह्यातील फसवणुकीचे पैसे दुसऱ्याच्या बँक खात्यात वळते करून काढण्यात येतात. आता हे पैसे काढण्यासाठी खातेधारकांना सहली आणि मेजवानीचे आमिष दाखवले जात असल्याचे समोर आले आहे. उत्तर सायबर पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींच्या चौकशीतून ही माहिती उघडकीस आली आहे.
मुंबई पोलिसांच्या उत्तर सायबर विभागात २० लाख रुपयांच्या फसवणुकीचा एक गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. कंबोडियामधील सायबर भामटे विविध योजनांचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करीत होते. या दोन आरोपींकडे नागरिकांची बँक खाती मिळविण्याचे काम देण्यात आले होते. सायबर फसवणुकीत आलेली रक्कम अशा बँक खात्यात वळविण्यात येते. ही बँक खाती कुणाची आणि कशी मिळवली याबाबत तपास करताना पोलिसांना एक नवीन माहिती मिळावली.
सहलीचे आमिष दाखवून दिशाभूल
पूर्वी बनावट कागदपत्रांच्या आधारे आणि नागरिकांना कमिशन देऊन बॅंक खाती उघडली जात होती. मात्र त्यामध्ये धोका होता आणि पकडले जाण्याची शक्यता होती. त्यामुळे आरोपींनी आता नवीन शक्कल लढवत आहेत. नागरिकांना हॉलीडे पॅकेजची ऑफर देण्यात येते. कंपनीच्या नावाने विशेष योजना असून त्याअंतर्गत महाबळेश्वर, खंडाळा आदी ठिकाणी दोन – तीन दिवसांच्या सहलीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
नागरिकांचा एक गट घेऊन आरोपी त्यांच्यासोबत सहलीला जातात. मग तेथे मेजवानीचे आयोजन केले जाते. त्यामुळे नागरिकांना संशय येत नाही. या नागरिकांकडून बॅंकेचे तपशील घेतले जातात आणि त्यांच्या मोबाइलवर एक ओटीपी पाठविण्यात येतो. तो ओटीपी घेऊन मग बॅंक खात्यात आलेले सायबर गुन्ह्याचे पैसे काढून घेतले जातात, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
यात बँकखातेदारांचे काहीच नुकसान होत नाही आणि त्यांना जराही संशय येत नाही, असे पोलिसांनी सांगितले. अशा प्रकारची शेकडो बॅंक खात्यांचा वापर केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. सध्या पोलीस अशा बँक खातेदारांची माहिती मिळवत आहेत. त्यांना या गुन्ह्यात साक्षीदार करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कंबोडियामध्ये सायबर भामटे
सायबर गुन्हेगारांची टोळी कंबोडियातून सायबर फसवणूक करीत आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक यापूर्वी कंबोडियामध्ये जाऊन आला होता. भारतातील तरूणांना नोकरीचे आमिष दाखवून कंबोडियामध्ये नेऊन त्यांच्याकडून सायबर गुन्हेगारी करवून घेतली जात आहे.