मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाने ‘शून्य मृत्यू’ मोहिमेअंतर्गत मुंबई महानगरातील कार्यालयांना पत्रव्यवहार करून कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलण्याची विनंती केली आहे. कार्यालयीन वेळेत बदल झाल्यास मुंबईच्या डबेवाल्यांना अधिकारी, कर्मचाऱ्यांना दुपारचा जेवणाचा डबे पोहोचविण्याचे काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. पुरवठा साखळी विस्कळीत होऊन ‘वक्तशीरपणा’ कोलमडण्याची भीती आहे. त्यामुळे कार्यालयीन वेळेत बदल करण्याबाबत मुंबईच्या डबेवाल्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबईत दररोज गर्दीचे लोंढे येतच आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे सार्वजनिक वाहतूक सेवेवर प्रचंड भार वाढला आहे. उपनगरीय रेल्वेगाडीतून प्रवास करताना विविध कारणांमुळे दररोज अनेक प्रवाशांचा मृत्यू होतो. प्रवासादरम्यान गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. लोकलमधील अनियंत्रित गर्दीवर नियंत्रण मिळवणे प्रशासनाला कठीण जात आहे. यावर उपाय म्हणून मुंबईतील कार्यालयांच्या वेळा बदलून लोकलमधील गर्दी विभाजित करण्याचा पर्याय पुढे आला आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेने मुंबई महानगरातील स्थानिक स्वराज संस्था, सरकारी, निमसरकारी, महापालिका, खासगी कार्यालये आदी संस्थांना पत्र पाठवले आहे.

मुंबई डबेवाला असोशिएशनचे म्हणणे काय…

मध्य रेल्वेने मुंबईतील शासकीय आणि खासगी अशा ८०० हून अधिक संस्था, कंपन्यांना कार्यालयीन वेळेत बदल करण्याबाबत पत्र पाठवले आहे. सकाळी आणि सायंकाळी होणारी लोकलमधील गर्दीची समस्या सोडवण्यासाठी कार्यालयीन वेळांमध्ये टप्प्याटप्प्याने बदल करण्यासाठी राज्य सरकारनेही हस्तक्षेप करावा, अशी विनंतीही या पत्रात करण्यात आली आहे. कार्यालयाच्या वेळा बदलायच्या असतील, तर त्या निश्चित बदला. पण त्यावेळा बदलताना कार्यालयामधील जेवणाची वेळ बदलू नका. जर कार्यालयामध्ये जेवणाच्या वेळा बदलल्या तर, डबेवाला कामगाराला त्यावेळा पाळणे शक्य होणार नाही. त्याची पुरवठा साखळी विस्कळीत होईल. त्यामुळे कार्यालयांनी जेवणाच्या वेळा बदलू नये, असे मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.

लोकलचा प्रवास धोकादायक का झाला ?

सकाळी गर्दीच्या वेळी नोकरदार कार्यालयात जाण्यासाठी प्रचंड गडबडीत असतात. तसेच लोकल सेवा विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना इच्छित लोकल वेळेत पकडता येत नाही. त्यामुळे एका लोकलमध्ये दोन ते तीन लोकलची गर्दी होते. त्यामुळे प्रवासी धावत्या लोकलच्या दरवाजातून पडणे, बाहेरील खांबाचा प्रवाशाला जोरदार फटका बसणे अशा घटना घडत आहेत. तर, रेल्वे रूळ ओलांडण्याच्या प्रकारामुळे लोकल प्रवास धोकादायक होऊ लागला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१० हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जानेवारी २०२१ ते मे २०२५ या कालावधीत प्रवासादरम्यान एकूण १० हजार २३९ प्रवाशांचा मृत्यू झाला. रेल्वे रूळ ओलांडताना मध्य रेल्वेवर ३,१५१, तर पश्चिम रेल्वेवर १,९७० प्रवाशांचा मृत्यू झाला. तर, लोकलमधून पडून मध्य रेल्वेवर १,६६७, तर पश्चिम रेल्वेवर ६८० प्रवाशांचा मृत्यू झाला, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.