मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पावसाची रिपरिप सुरु आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात संथ गतीने वाढ होत असून धरणांत आता ९७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. या सातही धरणांची पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी असून आता धरणांमध्ये १४ लाख ०७ हजार २१८ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची अधूनमधून रिपरिप सुरु असल्याने संथ गतीने पाणीसाठा वाढत आहे. जूनमध्ये झालेल्या मुसळधार पावसातच धरणे ५० टक्क्यांपर्यंत भरली होती. मात्र, जुलैच्या अखेरीस पावसाचा जोर कमी झाला. त्यानंतर संथ गतीने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

सोमवारी सकाळी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत धरणांमध्ये एकूण २४५ मिमी पाऊस झाला. त्यानुसार, सातही धरणांमधील पाणीसाठा ९७.२३ टक्के झाला आहे. गतवर्षी ८ सप्टेंबर रोजी हा पाणीसाठा ९७.७५ टक्के होता. सद्यस्थितीत ऊर्ध्व वैतरणामध्ये ९७.८८ टक्के, मध्य वैतरणामध्ये ९७.५ टक्के, तानसामध्ये ९८.६९ टक्के व भातसामध्ये ९६.१४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच मोडकसागर, विहार आणि तुळशी तलावात प्रत्येकी १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

दरम्यान, यंदा सातपैकी ४ तलाव भरले असून अन्य तीन तलाव भरण्याच्या प्रतीक्षेत आहेत. सात धरणांपैकी मोडकसागर तलाव ९ जुलै रोजी सर्वात आधी पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला होता. त्यानंतर २३ जुलै रोजी तानसा तलाव भरला. तसेच, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्याअखेरीस झालेल्या मुसळधार पावसामुळे १६ ऑगस्ट रोजी तुळशी, तर १८ ऑगस्ट रोजी विहार तलाव तुडुंब भरून वाहू लागला होता.