मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व प्रमुख व अंतर्गत रस्ते, दुभाजक, पदपथ यासह बाजारपेठ परिसर चकचकीत करण्यासाठी महानगरपालिकेने १५ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत दिवाळीपूर्व विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले आहे. सर्व परिमंडळांचे उपायुक्त, तसेच सर्व प्रशासकीय विभाग स्तरावरील सहायक आयुक्त यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अधिक दक्षतेने स्वच्छता मोहीम राबवण्याचे आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. या मोहिमेत पिंक आर्मीही सहभागी होणार आहे.

महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांच्या आदेशांनुसार, उप आयुक्त किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली ‘स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई’ हा ध्यास घेऊन विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, मुंबईत व्यापक स्वच्छतेच्या अनुषंगाने वेळोवेळी विशेष स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. त्याअंतर्गत १५ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत दिवाळीपूर्व विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसाच्या दुसऱ्या सत्रात स्वच्छतेसाठी नेमण्यात आलेल्या ‘पिंक आर्मी’च्या सहाय्याने ही मोहीम सायंकाळी व रात्रीच्या वेळेत राबविण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने सर्व प्रमुख व अंतर्गत रस्ते, दुभाजक, पदपथ, चौक व बाजारपेठ परिसरांची संपूर्ण स्वच्छता केली जाईल. तसेच, रस्ते – गल्लीबोळातील कचरा, माती, राडारोडा आदी संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येईल.

येत्या शनिवारपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. त्यामुळे, सण साजरा करण्याच्या उत्साहासोबतच मुंबईतील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ आणि नीटनेटकी राहावीत, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी महानगरपालिकेतर्फे ‘पिंक आर्मी’चा सहभाग, वाढीव मनुष्यबळ आणि आवश्यक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या विविध परिमंडळांचे उपायुक्त, तसेच सर्व प्रशासकीय विभाग स्तरावरील सहाय्यक आयुक्त यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अधिक दक्षतेने आणि स्वच्छता मोहीम राबवावी, अशा सूचना जोशी यांनी यंत्रणांना केली.

दरम्यान, नाल्यांमधील तरंगता कचरा काढण्यासाठी महानगरपालिकेकडून २९ सप्टेंबर २०२५ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. एकूण ४,९७४ मनुष्यबळ, स्वच्छतेसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या ४७९ साधनसामग्री, तसेच वाहनांच्या साहाय्याने सर्व प्रशासकीय विभागात विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण १२४.५५ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. तसेच, कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. या मोहिमेत घनकचरा व्यवस्थापन विभाग, पर्जन्यजल वाहिनी विभाग, परिरक्षण विभाग, स्वयंसेवी संस्था, तसेच स्थानिक नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता.