मुंबई : महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) विमान कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला अमेरिकेतून भारतात सोन्याची तस्करी करण्याच्या आरोपाखाली अटक केली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारालाही अटक करण्यात आली असून तस्करी करण्यात आलेले सुमारे दीड कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले.

याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी गिरीश पिंपळेला (४२) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. तो न्यूयॉर्कहून भारतात आला होता. सीमाशुल्क विभागाच्या ग्रीन चॅनेलमधून बाहेर पडत असताना त्याला थांबवण्यात आले. तपासादरम्यान, पिंपळेकडून कागदपत्रे जप्त करण्यात आली. त्यात सोने खरेदीबाबत हाती लिहिलेली आकडेवारी होती. यामुळे त्याच्या तस्करीतील सहभागाबद्दल डीआरआयच्या अधिकाऱ्यांचा संशय बळावला आणि त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीत पिंपळेने तस्करीतील सहभागाची कबुली दिली. त्याने आंतरराष्ट्रीय आगमन हॉलमधील सामान सेवांच्या भागाजवळ असलेल्या एका सोफ्याच्या शेजारी ठेवलेल्या पिशवीत १ हजार ३७३ ग्रॅम सोने सापडले. त्याची किंमत सुमारे एक कोटी ४१ लाख रुपये आहे. ते सोने जप्त करण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रधार राकेश राठोडलाही अटक

तस्करी करून आणलेले सोने राकेश राठोडला द्यायचे होते, असे पिंपळेने चौकशीत सांगितले. तोच या संपूर्ण प्रकणाचा मुख्य सूत्रधार असून त्यालाही शनिवारी अटक करण्यात आली. अमेरिकेत सोने खरेदी करण्यासाठी राठोड पिंपळेला रोख रक्कम द्यायचा. पिंपळे भारतात सोने तस्करी करून आणायचा आणि नंतर राठोडकडे सुपूर्द करायचा. त्यात मोठा नफा मिळत होता. विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांची तपासणी होत नाही, याचा फायदा घेऊन राठोडने पिंपळेचा वापर करण्याचा कट रचला होता.

प्रत्येक किलोमागे दोन लाख मिळायचे

तस्करी करून आणलेल्या एक किलो सोन्याच्या बदल्यात दोन लाख रुपये देण्याचे आश्वासन राठोडने दिले होते. यासाठी राठोड हवाला मार्गाने अमेरिकेत पैसे पोहोचवायचा. अलीकडेच त्याने अमेरिकेत सव्वा कोटी रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर्स उपलब्ध करून दिले होते. त्यातून पिंपळेने सोने विकत घेतले आणि तस्करी करून भारतात आणले. दोघे गेल्या वर्षभरापासून एकमेकांच्या संपर्कात होते. याआधी दोन वेळा पिंपळेने राठोडसाठी सोन्याची तस्करी केल्याचे उघड झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राठोडचा गुन्हेगारी इतिहास

यापूर्वी मुंबई सीमाशुल्क विभागाने २०२० मध्ये राठोडविरोधात सोन्याच्या तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सध्या डीआरआय या प्रकरणी अधिक तपास करीत आहे. या टोळीतील इतर आरोपींची माहिती मिळविण्यात येत असून सोने खरेदीसाठी वापरलेला निधी कुठून आला याचा शोध घेण्यात येत आहे. दोघांनाही सीमा शुल्क कायद्यानुसार अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.