मुंबई – आईने खेळण्याऐवजी शिकवणीसाठी जाण्यासाठी सांगितल्याने रागावलेल्या १४ वर्षीय मुलाने ५७ मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. कांदिवलीत बुधवारी संध्याकाळी ७ वाजता ही घटना घडली. मयत मुलगा गुजराथी अभिनेत्रीचा एकुलता एक मुलगा होता.
कांदिवली पश्चिम येथे सी ब्रुक नावाची टोलेजंग इमारत आहे. या इमारतीच्या ५७ व्या मजल्यावर गुजराथी अभिनेत्री आपल्या मुलासह रहात होती. बुधवारी संध्याकाळी ७ वाजता तिने १४ वर्षाच्या मुलाला शिकवणीसाठी जाण्यास सांगितले. मात्र त्याला खेळण्यासाठी खाली जायचे होते. परंतु त्याच्या आईने शिकविणासाठी जावे लागेल असे बजावले. मित्रांसह खेळायला जाता येणार नाही म्हणून तो नाराज झाला होता. आई ओरडल्याने तो रागाने घरातून निघाला. काही वेळातच त्याने इमारतीवरून उडी मारली. उंचावरून खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
कांदिवली पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली आहे. कांदिवली पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या इमारतीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासण्यात येत आहे. त्याने नेमक्या कुठल्या मजल्यावरून उडी मारली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी अडाणे यांनी दिली.