मुंबई: गणेशोत्सवात मंडप उभारण्यासाठी रस्त्यावर किंवा पदपथावर खड्डे खणल्यास सार्वजनिक मंडळांना यंदा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. प्रति खड्डा तब्बल पंधरा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार असल्याचा इशारा मुंबई महानगरपालिका प्रशासनाने परिपत्रकाद्वारे दिला आहे. आतापर्यंत प्रति खड्डा दोन हजार रुपये दंडाची रक्कम असताना एकदम त्यात सात पट वाढ केल्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पीओपीच्या मुर्तींचा न्यायालयीन वाद संपून त्यावर तोडगा निघत नाही तोच गणेशोत्सवाशी संबंधित आणखी एक वाद उफाळून आला आहे. गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी परवानगी देण्याकरीता मुंबई महापालिकेने यंत्रणा सुरू केली आहे. तसेच मंडळांसाठी मार्गदर्शक सूचनाचे परिपत्रकही काढले आहे. त्यात खड्ड्यांबाबतची सूचना देण्यात आली आहे.
मुंबईत सुमारे दहा ते अकरा हजार सार्वजनिक मंडळे असून त्यापैकी दोन ते तीन हजार मंडळे ही रस्त्यावर किंवा पदपथावर मंडप उभारून उत्सव करतात. या मंडळांना पालिकेकडून परवानगी घ्यावी लागते. गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्याकरीता मंडळे जेव्हा पालिका विभाग कार्यालयांकडे अर्ज करतात तेव्हा मंडळांना अनामत रक्कम भरावी लागते.
२० ते ४० हजारापासून लाखो रुपयांपर्यंत ही अनामत रक्कम असते. मंडप उभारण्यासाठी रस्त्यावर जे खड्डे खणले जातात ते मंडळांनी बुजवावे म्हणून ही रक्कम घेतली जाते. मंडळांनी खड्डे बुजवल्यास ही रक्कम मंडळांना परत केली जाते. खड्डे महापालिकेला बुजवावे लागले तर त्याचा खर्च या रकमेतून वजा केला जातो. अशी आतापर्यंतची पद्धत होती. यंदा मात्र महापालिकेने मंडपासाठी खड्डे खणण्यास मनाई केली आहे. खड्डा खणल्यास प्रति खड्डा १५ हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. मोठ्या व सुप्रसिद्ध मंडळांचे मंडप मोठे असतात. त्यामुळे त्यांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे.
महापालिकेने काय म्हटले आहे ..
मंडप उभारण्यासाठी रस्ते व पदपथावर खड्डे खोदण्यात येऊ नये. मंडप उभारण्यासाठी खड्डा खोदल्याचे आढळ्यास संबंधित मंडळांकडून रस्त्याच्या पुनर्बांधणीचा खर्च व दंड याकरीता एकूण १५ हजार रुपये प्रति खड्डा इतकरी रक्कम वसूल करण्यात येईल.
रस्ते कॉंक्रीटीकरणावर कोट्यवधींचा खर्च
मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांवरून मुंबई महापालिकेला नेहमी लक्ष्य केले जाते. त्यामुळे खड्डेमुक्त मुंबईसाठी पालिकेने रस्ते कॉंक्रीटीकरणाचा तब्बल १२ हजार कोटींचा महाप्रकल्प हाती घेतला आहे. ५० टक्क्यांहून अधिक रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण झाले आहे. हे रस्ते आता कोणत्याही कारणास्तव खोदण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच पावसाळ्यातील खड्डे बुजवण्यासाठीही मुंबई महापालिकेने सुमारे २०० कोटींचे कंत्राट दिले आहे. त्यामुळे यंदा मुंबई महापालिका प्रशासनाने रस्त्यांवरील खड्डयांबाबत गणेशोत्सव मंडळांनाही सक्त ताकीद दिली आहे.
गणेशोत्सव समितीचा विरोध
दरम्यान, पालिकेच्या या निर्णयाला गणेशोत्सव समितीने विरोध केला आहे. पालिकेचा हा पवित्रा मंडळांसाठी जाचक असून हा दंड रद्द करण्याची मागणी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची प्रतिनिधीत्व करणाऱ्या बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक शनिवारी दादर येथे पार पडली. या बैठकीत ही मागणी करण्यात आली.
रस्त्यावरच्या खड्डयांसाठी कंत्राटदारावर कारवाई करणार का
मागील कित्येक वर्ष प्रति खड्डा २ हजार इतका दंड होता मात्र आता दंडाची रक्कम १५ हजार इतकी वाढवली हे शुल्क अवाजवी आणि भरमसाठ आहे. उत्सवानंतर खड्डे बुजवण्याची जबाबदारी गणेशोत्सव मंडळे घेतात मात्र तरिही त्यांच्यावर पालिका कारवाई करते. मग मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्यांबाबत पालिका संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करणार का, असा सवाल समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड. नरेश दहिबावकर यांनी केला आहे.