गेल्या काही वर्षांपासून रखडलेली मुंबई अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. अग्निशामक या पदाच्या तब्बल ९१० जागांसाठी भरती होणार असून लवकरच त्याकरिता जाहिरातही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारांना पोलीस भरतीप्रमाणे वयाची अट दोन वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाचा तिढा, टाळेबंदी व करोनामुळे मुंबई अग्निशमन दलातील रखडलेली भरती प्रक्रिया आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. २०१७ मध्ये यापूर्वी भरती झाली होती, तशीच भरती आता होणार आहे. बारावी उत्तीर्ण इच्छुक उमेदवारांची पारंपरिक पद्धतीने शारीरिक तपासणी, वैद्यकीय तपासणींचा या प्रक्रियेत समावेश आहे.

मुंबई अग्निशमन दलात सुमारे तीन हजार अग्निशामक जवान, अधिकारी, वाहनचालक असे मनुष्यबळ आहे. त्यापैकी अडीच हजार अग्निशामक जवान आहेत. मात्र पदोन्नती किंवा निवृत्तीमुळे पदे मोठय़ा प्रमाणावर रिक्त झाली आहेत. या जागांसाठी ही भरती होणार असल्याची माहिती अग्निशमन दल प्रमुख संजय मांजरेकर यांनी दिली. दहिसर पश्चिमेकडील भावदेवी मैदानात ही भरती प्रक्रिया होणार असून त्याचे चित्रीकरणही केले जाणार आहे. त्याकरिता अग्निशमन दलाने नुकत्याच निविदा मागवल्या आहेत.

प्रत्यक्ष रुजू होण्यास एक वर्ष..
जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर डिसेंबरअखेपर्यंत प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर उमेदवार निवडीची प्रक्रिया, वैद्यकीय चाचणी याकरिता दोन महिने लागतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उमेदवारांचे प्रशिक्षण अशा प्रक्रिया पार पाडून सगळे सुरळीत झाले तरी उमेदवारांना प्रत्यक्ष रुजू होण्यासाठी एक वर्ष जाईल, असे संजय मांजरेकर यांनी सांगितले.

वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवली
’टाळेबंदीमुळे पोलीस भरतीमध्ये जशी वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवली तशीच सवलत या भरतीतही देण्यात येणार असून त्याला नुकतीच प्रशासकीय मंजुरी मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

’त्यामुळे आता खुल्या गटासाठी वयोमर्यादा २५ ऐवजी २७ वर्षे असेल तर आरक्षणासाठी हीच मर्यादा ३० ऐवजी ३२ वर्षे असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

’तसेच सातत्याने रिक्त होणाऱ्या पदासाठी प्रतीक्षा यादी करता येईल का याबाबतही विचार केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.