मुंबई : जोगेश्वरी (प.) येथील एस. व्ही. रोडवरील जे. एन. एस. बिझनेस सेंटर या बहुमजली इमारतीत गुरुवारी सकाळी आग लागली. ही आग सकाळी सुमारे पावणेअकरा वाजता लागली असून मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम सुरू केले.

मात्र आगीची तीव्रता वाढल्यामुळे अग्निशमन केंद्राने क्रमांक २ ची वर्दी दिली. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ही आग बहुमजली इमारतीत लागली असून तिचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) पथक, पालिकेचे कर्मचारी, तसेच वीज वितरण कंपनीचे कर्मचारी दाखल झाले आहेत.

या दुर्घटनेत अद्याप जखमींची नोंद झालेली नाही.