मुंबई : यंदा गणेशोत्सवात मुंबईतील एकूण गणेशमूर्तींपैकी तब्बल ९८ टक्के मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले आहे. दरवर्षी हे प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी असते. यंदा उच्च न्यायालयाचा आदेश, मुंबई महापालिकेच्या अंमलबजावणीमुळे जवळपास सर्वच मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. गेल्यावर्षी ८५ हजार मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले होते. तर यंदा हेच प्रमाण १ लाख ८४ हजारावर होते, असेही आढळून आले आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवात जलप्रदूषणाला आळा बसल्याची अपेक्षा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
गणेशोत्सवात गणेशमूर्ती नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित केल्यामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून कृत्रिम तलाव तयार करण्यात येत आहेत. मात्र आतापर्यंत कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करणे ही ऐच्छिक बाब होती. यंदा मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे सहा फुटांखालील सर्वच मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. पीओपीच्या मूर्तींचा वाद न्यायालयात गेला.
न्यायालयाने जलप्रदूषण रोखण्यासाठी सहा फुटांखालील पीओपीच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे आदेश दिले होते. तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सरसरट सर्वच लहान मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याबाबतचे आदेश दिले होते. या आदेशाची मुंबई महापालिकेने अंमलबजावणी केली. यंदा मुंबई महापालिकेने सर्वाधिक म्हणजे २९० कृत्रिम तलाव मुंबईत विविध ठिकाणी तयार केले होते. तसेच कृत्रिम तलावातच विसर्जन करण्यात यावे याकरीता पथकेही नेमली होती. तसेच पोलिसांचीही मदत घेतली होती. सरसकट सगळ्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्याच्या आदेशामुळे अनेक ठिकाणी गणेशभक्त व पालिकेची यंत्रणा यांच्यात वादही झाले. मात्र तरीही गणेश भक्तांना कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करणे भाग पडले. त्यामुळे यंदा कृत्रिम तलावातील विसर्जनाची टक्केवारी वाढली आहे.
पर्यावरण पूरक मूर्तींची संख्याही वाढली
यंदा गणेशोत्सवापूर्वी खूप महिने आधीपासून पीओपीच्या मूर्तींचा वाद सुरू होता. त्यामुळे पर्यावरणपूरक मूर्तींबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली होती. यंदा त्याचा चांगला परिणाम दिसून आला. यावेळी जेवढ्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले, त्यात ६१ टक्के मूर्ती पीओपीच्या होत्या. तर ३९ टक्के मूर्ती पर्यावरणपूरक होत्या. दरवर्षी पर्यावरणपूरक मूर्तींचे प्रमाण यापेक्षा कमी असते.
२०२५ ची आकडेवारी
एकूण मूर्तींचे विसर्जन – १ लाख ८८ हजार ३८७
कृत्रिम तलावात विसर्जन – १ लाख ८४ हजार ००२ (९८ टक्के) नैसर्गिक तलावात विसर्जन – ४३८५ (०२ टक्के) कृत्रिम तलावांची संख्या – २९०
२०२४ ची आकडेवारी एकूण मूर्तींचे विसर्जन – २ लाख ३ हजार १६९
कृत्रिम तलावात विसर्जन – ८५,३०९ (४० टक्के)
नैसर्गिक तलावात विसर्जन – १ लाख १७ हजार ८६३ (६० टक्के)
कृत्रिम तलावांची संख्या – २०४