Lalbaugcha Raja VIP Darshan Controversy : मुंबई : ‘लालबागच्या राजा’च्या दर्शनासाठी सामान्य नागरिक आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी (व्हीआयपी) असलेल्या वेगवेगळ्या रांगांमुळे लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ अडचणीत आले आहे. दर्शन व्यवस्थेतील या भेदभावामुळे मानवाधिकार आयोगाने लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला नोटीस बजावली असून याबाबत अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली आहेत. तसेच, याप्रकरणी ६ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. ॲड आशिष राय आणि पंकज मिश्रा यांनी दर्शन व्यवस्थेबाबत आयोगाकडे तक्रार केल्याच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस बजावण्यात आली आहे.

दरवर्षी विविध कारणांमुळे लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ चर्चेत येते. तसेच, देशभरातून लाखो भाविक लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे गणेशोत्सवात लालबागमध्ये कायम प्रचंड गर्दी असते. भाविकांना तासंतास रांगेत उभे राहावे लागते. मंडळातर्फे अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि अन्य सामान्य गणेशभक्तांसाठी स्वतंत्र रांगा असतात. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या रांगेतून अनेकांना काही मिनिटांतच लालबागच्या राजाचे दर्शन मिळते. त्यामुळे अन्य भाविकांचा अपमान होत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. लालबागच्या राजाच्या दर्शन व्यवस्थेवरून ॲड आशिष राय आणि पंकज मिश्रा यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

मानवाधिकार आयोगाने या तक्रारीची दखल घेत मंडळाला नोटीस बजावली आहे. तसेच, राज्याचे मुख्य सचिव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष व सचिवांना सहा आठवड्यांत अहवाल सादर करण्याची सूचना आयोगाने केली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

दरम्यान, सार्वजनिक उत्सव असूनही दर्शनासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि सामान्य नागरिकांसाठी स्वतंत्र रांग लावून भक्तांच्या भावनांचा अनादर होत आहे. तसेच, सामान्यांना तासंतास रांगेत उभे राहावे लागते, तर काही मोजक्या लोकांना विशेष सवलत मिळते. हे मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे, असे आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दर्शन व्यवस्थेत भेदभाव टाळावा आणि सामान्य भाविकांना न्याय द्यावा, अशी मागणी आयोगाकडे करण्यात आली आहे. शिवाय २२ सप्टेंबर २०२३ व १४ सप्टेंबर २०२४ रोजीही याबाबात तक्रार करण्यात आली होती.

मात्र, त्यावेळी तक्रारींची दखल घेण्यात आली नव्हती. गर्दी नियंत्रणातील त्रुटींमुळे चेंगराचेंगरी होण्याची भीती आहे. मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या वर्तनामुळे लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध तसेच सामान्य भाविकांच्या मानवी अधिकारांचे उल्लंघन झाल्याची तक्रार करण्यात आली होती.

यासंदर्भात लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.