मुंबई : मुंबईतून कोकणात जाण्यासाठी बहुसंख्य प्रवासी जनशताब्दी एक्स्प्रेसला पसंती देतात. परंतु, मुंबई-गोवा जनशताब्दी एक्स्प्रेसला बुधवारी एक डबाच जोडला गेला नाही. यामुळे आरक्षित तिकीटधारक प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. ऐनवेळी डीएल – १ डबा उपलब्ध न झाल्याने प्रवाशांना इतर डब्यातून प्रवास करण्याची नामुष्की ओढवली.

आरक्षित तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वेगाड्यांमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. परंतु, आरक्षित तिकीटधारक प्रवाशांचा डबाच गायब झाल्याने प्रवाशांचा प्रवास अडचणीचा झाला. गाडी क्रमांक १२०५१ सीएसएमटी- मडगाव एक्स्प्रेस बुधवारी नेहमीप्रमाणे सुटली. परंतु, रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या प्रवाशांचा प्रचंड गोंधळ उडाला. तिकीट आरक्षित आसलेला डबाच नसल्याने प्रवाशांनी इतर डब्यात प्रवेश केला. या रेल्वेगाडीला डीएल -१ डबा जोडला नव्हता.

डीएल – १ डबा हा राखीव, विनावातानुकूलित डबा असून त्याला जोडून सामानाचा डबा होता. रेल्वेगाडीत प्रवेश केल्यानंतर प्रवाशांनी तिकीट तपासनीसाला जाब विचारण्यास सुरुवात केली. परंतु, तिकीट तपासनीस देखील हतबल झाले होते. त्यांनी प्रवाशांची इतर डब्यात बसण्याची व्यवस्था केली. परंतु, डीएल-१ डब्यात ३५ ते ३६ प्रवाशांना एकाच वेळी जागा उपलब्ध झाली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली. दरम्यान, काही तांत्रिक अडचणींमुळे डीएल – १ डबा जोडला नसल्याचे कारण रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आले. या रेल्वेगाडीला एक एसएलआर डबा आणि जनरेटर डबा असतो. परंतु, ८ ऑक्टोबर रोजी डीएल – १ डब्याऐवजी एक जादा जनरेटर डबा जोडण्यात आला होता. त्यामुळे या रेल्वेगाडीला दोन जनरेटर डबे होते.

मध्य रेल्वेचा निष्काळजीपणा

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या अख्यत्यारित सीएसएमटी – मडगाव रेल्वेगाडी असून ही रेल्वेगाडी चालविण्याची जबाबदारी मध्य रेल्वेची आहे. या रेल्वेगाडीच्या डीएल – १ डब्यात तांत्रिक बिघाड झाल्याने तो हटविण्यात आला. त्यानंतर या रेल्वेगाडीला पर्यायी डबा लावणे अपेक्षित होते. परंतु, त्या ठिकाणी जनरेटर डबा जोडण्यात आला. सध्या मध्य रेल्वेवरून विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येत असल्याने पर्यायी डबे उपलब्ध नाहीत. परिणामी, जनशताब्दी एक्स्प्रेसच्या प्रवाशांचे हाल झाले. मध्य रेल्वेचा हा निष्काळजीपणा असल्याचा आरोप करीत प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

सीएसएमटी – मडगाव रेल्वेगाडी मध्य रेल्वेच्या अख्यारित आहे. डब्यांची संरचना मध्य रेल्वेतर्फे निश्चित करण्यात येते. – सुनील नारकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे