मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी मुंबईची ओळख आहे. मात्र आता आर्थिक गुन्ह्यांची राजधानी अशीही मुंबईची ओळख बनू लागली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी) प्रसिध्द केलेल्या अहवालात २०२३ मध्ये देशातील सर्वाधिक (६ हजार ४७६) आर्थिक गुन्ह्यांची नोंद मुंबईत झाली आहे. दुसरीकडे देशात महाराष्ट्रही आर्थिक गुन्ह्यात तिसऱ्या स्थानावर आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागातर्फे (एनसीआरबी) देशभरातील गुन्ह्यांची नोंद, आकडेवारी आणि विश्लेषण करण्यात येते. दरवर्षी एनसीआरबीकडून भारताचा गुन्हे अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो. या अहवालातून विविध राज्ये व शहरांमधील गुन्ह्यांची स्थिती व प्रवृत्ती मांडण्यात येते. एनसीआरबीने नुकताच २०२३ मधील देशातील गुन्ह्यांची स्थिती दर्शविणार अहवाल प्रसिध्द केला आहे.
मुंबई आता आर्थिक गुन्ह्यांची राजधानी
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मात्र याच मुंबईत मोठ्या प्रमाणात आर्थिक गुन्हेगारी होत आहे. मुंबईत २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये अशा गुन्ह्यांची संख्या कमी झाली असली देशाच्या तुलनेत सर्वाधिक आर्थिक गुन्हे मुंबईत घडले आहेत. त्यामुळे मुंबई आर्थिक गुन्ह्यांची राजधानी बनू पाहात आहे.
मुंबईत २०२३ मध्ये आर्थिक फसवणुकीचे ६ हजार ४७६ गुन्हे दाखल करण्यात आले. मुंबईनंतर हैदराबादमध्ये आर्थिक गुन्ह्यांची ५,७२८ प्रकरणे नोंदवली गेली असून, जयपूर ५,३०४ प्रकरणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
मुंबईत २०२१ मध्ये आर्थिक फसवणुकीचे ५ हजार ६७१ आणि २०२२ मध्ये ६ हजार ९६० प्रकरणे नोंदवली गेली होती. तर २०२३ मध्ये ६ हजार ४७६ प्रकरणे नोंदविण्यात आली. २०२२ च्या तुलनेन ४८४ ने हे गुन्हे घटले होते. परंतु तरी देशाच्या तुलनेत हे सर्वाधिक गुन्हे आहेत. यापैकी ३७.९ टक्के प्रकरणांमध्ये पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे, असे अहवालात म्हटले आहे.
मुंबईत दाखल आर्थिक गुन्हे
२०२१ : ५,६७१ प्रकरणे
२०२२ : ६,९६० प्रकरणे
२०२३ : ६,४७६ प्रकरणे
फसवणुकीच्या गुन्ह्यात सातत्याने वाढ
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. २०२१ मध्ये आर्थिक फसवणुकीची १५ हजार ५५० प्रकरणे नोंदवली गेली होती, २०२२ मध्ये ही संख्या १८ हजार ७२९ वर पोहोचली. २०२३ मध्ये ही संख्या वाढून १९ हजार ८०३ वर गेली, असे अहवालात म्हटले आहे. देशीतील अन्य राज्याच्या तुलने राजस्थान २७ हजार ६७५ आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तेलंगणा २६ हजार ३२१ प्रकरणांसह दुसऱ्या क्रमांकावर असून, महाराष्ट्र १९ हजार ८०३ प्रकरणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. एकूण आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांपैकी महाराष्ट्रात पोलिसांनी ५४.९ टक्के प्रकरणांत आरोपपत्र दाखल केले, असे आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. बँका, आर्थिक व्यवहार, कंपन्या आणि ऑनलाइन व्यवहार खूप मोठ्या प्रमाणात होतात. गेल्या काही वर्षांत यूपीआय आणि डिजिटल पेमेंट वाढल्यामुळे सायबर फसवणुकीचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.
राज्यातील दाखल आर्थिक गुन्हे
२०२१- १५ हजार ५५०
२०२२-१८ हजार ७२९
२०२३- १९ हजार ८०३