मुंबई : मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेसला तळेगाव (दाभाडे) रेल्वे स्थानकावर अप आणि डाऊन असा दोन्ही वेळेस थांबा द्या, अशी मागणी करणारी याचिका पुणे प्रवासी संघाने (पीपीएस) उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी झाली. त्यावेळी, याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने प्रतिवादींना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले व सुनावणी ८ ऑगस्टपर्यंत तहकूब केली.
सिंहगड एक्स्प्रेसला तळेगाव येथे अप आणि डाऊन असा दोन्ही वेळेस थांबा देण्यासंदर्भात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी, व्यवसायिक आणि संसद सदस्यांनीही वर्षानुवर्षे रेल्वे मंत्रालय, रेल्वे मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे (सीएसएमटी) महाव्यवस्थापक आणि पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे पत्रव्यवहार करून निवेदन सादर केली आहेत. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्याचा दावा करून पुणे प्रवासी संघाच्या वतीने वकील नितेश नेवाशे यांनी याचिका दाखल केली आहे.
तळेगाव हे भीमाशंकर, आळंदी आणि देहू या धार्मिक स्थळांपासून जवळ असल्यामुळे येथून जाणाऱ्या भाविकांची संख्याही खूप मोठी आहे. येथे डी. वाय. पाटील अभियांत्रिकी आणि नर्सिंग महाविद्यालय आणि एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय यासारख्या प्रमुख शैक्षणिक संस्था आहेत. दुसरीकडे, पुणे रेल्वे विभागाने लोणावळा आणि पुणे दरम्यानची लोकल सेवा करोना काळात बंद केली होती. ती पूर्ववत करण्यात आलेली नाही. तथापि, वाढती लोकसंख्या त्यातच पर्यायी सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय उपलब्ध नसल्यामुळे आणि खासगी वाहतूक आर्थिकदृष्ट्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे, लोणावळा आणि पुणे दरम्यान सकाळी ११.२५ ते दुपारी ३.५६ या महत्त्वाच्या वेळी लोकल पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्याची मागणीही याचिकाकर्त्यांनी केली आहे.