Mumbai Waterlogging Train Updates : मुंबई : मुंबई शहर तसेच उपनगरात आज पहाटेपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात पुढील तीन चार तास पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यामुळे आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका असे आवाहन करण्यात आले आहे.
मागील तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज मुंबईत पावसाचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. पहाटेपासून पावसाचा जोर असल्यामुळे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. दादर, अंधेरी या भागात गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे कार्यालय गाठताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे.
पावसाचा जोर कायम राहणार असल्याने आणखी काही भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊनच बाहेर पडा अशी सूचना हवामान विभागाने दिली आहे. पहाटेपासून विलेपार्ले, अंधेरी, जुहू, वांद्रे, चेंबूर, दादर, भायखळा, परळ आणि वरळी या भागात पावसाचा जोर सर्वाधिक आहे.
भरती ओहोटी केव्हा
- भरती – सायंकाळी ६:५१ – ३.०८ मीटर
- ओहोटी – मध्यरात्रीनंतर १:५६ (उद्या, १९ ऑगस्ट २०२५) – १.२२ मीटर
- भरती – सकाळी ९:१६ (उद्या, १९ ऑगस्ट २०२५) – ३.७५ मीटर
- ओहोटी – दुपारी ३:१६ (उद्या, १९ ऑगस्ट २०२५) – २.२२ मीटर
मुंबईत मागील एक तासात झालेला पाऊस
- कुलाबा उद्दंचन केंद्र – १०.१७ मिमी
- ब्रिटानिया उद्दंचन केंद्र – १२.६ मिमी
- वडाळा महानगरपालिका शाळा- ४४.६ मिमी
- वरळी महानगरपालिका शाळा- ४४.५ मिमी
- एफ साऊथ वॉर्ड- २४.८९ मिमी
- दादर अग्निशमन केंद्र – ३१.४ मिमी
- ना.म.जोशी मार्ग- २७.६ मिमी
- डी वॉर्ड – २४ मिमी
- वांद्रे अग्निशमन केंद्र – १४.९८ मिमी
- नरिमन पॉइंट – १२.८ मिमी
- भायखळा अग्निशमन केंद्र – १३.७२ मिमी
दोन कमी दाब क्षेत्र पोषक
उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत नवीन कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. याची तीव्रता वाढून, मंगळवारी ही प्रणाली जमिनीवर येण्याची शक्यता आहे. याचबरोबर विदर्भ आणि परिसरावर आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून, त्याला लागून समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. ही प्रणाली पश्चिमेकडे सरकून आज गुजरातकडे जाण्याची शक्यता आहे. या दोन्ही प्रणाली राज्यात पाऊस वाढविण्यास पोषक ठरणार आहेत.