मुंबई : पुण्यात २००८ मध्ये पूर्वाश्रमीच्या प्रेयसीची निर्घृण खून केल्याच्या आरोपाप्रकरणी सॉफ्टवेअर अभियंत्याला कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने नुकतीच कायम केली.
हे प्रकरण अत्यंत द्वेष, मत्सर आणि सूडबुद्धीने प्रेरित एका तरुणाने त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीचा क्रूरतेने केलेल्या खुनाशी संबंधित आहे, असेही न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने आरोपीची जन्मठेप कायम ठेवताना नमूद केले. मूळचा मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या दोषसिद्ध आरोपी मोहिंदर मधुरेश याला पुणे येथील सत्र न्यायालयाने डिसेंबर २०१६ मध्ये त्याच्यावरील सर्व आरोपांत दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला मोहिंदर याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. हे अपील न्यायालयाने फेटाळून लावले.
सामान्य माणसाचे विवेकपूर्ण आणि तर्कसंगत वर्तन शत्रुत्व व क्रूरतेच्या भावनांत रुपांतर होण्याचे हे प्रकरण आहे. अशा प्रकरणांत माणूस अमानवी आणि राक्षसी प्रवृत्तींमध्ये अडकतो. परिणामी, त्याच्याकडून गंभीर गुन्हा घडतो, असेही न्यायालयाने आरोपीची शिक्षा कायम करताना नमूद केले.
पोलिसांच्या आरोपांनुसार, आरोपीने २० ऑक्टोबर २००८ रोजी पूर्वाश्रमीच्या प्रेयसीचा पुण्यातील फ्लॅटमध्ये निर्घृण खून केला होता. त्यावेळी दोघेही २२ वर्षांचे होते आणि पुण्यात नोकरी मिळाल्यानंतर शहरात वास्तव्यास होते. मध्य प्रदेशात महाविद्यालयात असताना आरोपी आणि तरूणीमध्ये प्रेमाचे संबंध निर्माण झाले. तथापि, पुण्यात स्थलांतरित झाल्यानंतर, काही काळाने दोघांमध्ये मतभेद निर्माण होऊन तरूणीने आरोपीशी संबंध तोडले. तिच्या या निर्णयाने आरोपी संतापला होता आणि त्यानंतर तिला त्रास आणि धमकी देऊ लागला होता. तरूणीने आरोपीविरुद्ध तिच्या कार्यालयात छळ केल्याबद्दल तक्रार केली होती, त्यानंतर त्याला समज देण्यात आली होती.
न्यायालयाने आरोपीला सत्र न्यायालयाने सुनावलेली शिक्षा योग्य असल्याचे आदेशात म्हटले. तसेच, नातेसंबंध तोडल्याने संतापलेल्या आरोपीने राग आणि मत्सरातून तरूणीचा खून केल्याचे सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला यश आल्याचे नमूद केले.