मुंबई : मुसळधार पावसाचा फटका मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या कामकाजालाही बसला. सामान्यतः उच्च न्यायालयाचे कामकाज सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत चालते. परंतु. पावसामुळे मंगळवारी कामकाज अवघे दीड तासच म्हणजे दुपारी १२.३० पर्यंतच होऊ शकले.
मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवारीही पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू होता. शहरातील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. त्यातच मुंबई व उपनगरात अतिवृष्टी कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने सकाळी दिला. या पार्श्वभूमीवर, वकिलांची आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी उच्च न्यायालयाचे कामकाज दुपारी १२.३० पर्यंतच सुरू राहील, अशी नोटीस उच्च न्यायालय प्रशासनाने तातडीने प्रसिद्ध केली. त्यामुळे, उच्च न्यायालयाचे कामकाज दुपारी १२.३० पर्यंतच झाले.
मुंबईत पावसाचा जोर सोमवारपासूनच कायम असून त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. परिणामी न्यायालयीन कर्मचाऱ्यांना सोमवारी घरी जायला उशीर झाला. मुसळधार पाऊस मंगळवारीही कायम होता. या संततधारेमुळे आधी संथगतीने सुरू असलेली रेल्वे सेवा रुगळांमध्ये पाणी साचल्याने सकाळी ११.३० च्या सुमारास ठप्प झाली. पावसामुळे रस्ते वाहतुकही विस्कळीत झाली होती. त्यामुळे, बहुतांश न्यायालयीन कर्मचारी न्यायालयात पोहोचू शकले नाहीत.
काही वकिल, याचिकाकर्ते ऑनलाईन पद्धतीने न्यायालयात हजर होते. परंतु, पूर्णसंख्येने कर्मचारी वर्ग उपस्थित नसल्याने वकील आणि कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी अखेर कामकाज दुपारी १२.३० पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय उच्च न्यायालय प्रशासनाने जाहीर केला.