मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये विधानभवन परिसरात झालेल्या हाणामारीशी संबंधित चौकशीला उच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली.

याप्रकरणी पुढील आदेशापर्यंत आरोपपत्रही दाखल करू नये, असे आदेश देखील मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्याला दिले. तसेच, १२ नोव्हेंबर रोजी प्रकरणाची सुनावणी ठेवली.

या प्रकरणात आपल्या विरोधातील आरोप सिद्ध झालेले नाहीत. तसेच, आपल्या विरोधात दाखल गुन्हा राजकीय हेतूने प्रेरित आहे, असा दावा करून आरोपी नितीन देशमुख याने गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत तपासाला अंतरिम स्थगिती देण्याची मागणीही त्याने केली होती.