लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: जगातील विविध शहरांमधील नागरिकांच्या प्रामाणिकपणाची पडताळणी करण्यासाठी, अमेरिकेतील प्रसिद्ध इंग्रजी मासिक ‘रिडर्स डायजेस्ट’ने १६ मोठ्या शहरांमधीर रस्त्यांवर पैशांनी भरलेली १९२ पाकिटे सोडून एक अनोखे सर्व्हेक्षण केले. यामध्ये फिनलॅण्डची राजधानी असलेल्या हेलसिंकीने जगातील पहिल्या क्रमांकाचे प्रामाणिक शहर असल्याचा बहुमान पटकावला, तर भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रामाणिक शहर ठरले.

या सर्वेक्षणामध्ये प्रत्येक शहरामध्ये वर्दळीच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी पैशांनी भरलेली १२ पाकिटे ठेवण्यात आली होती. या पाकिटामध्ये एका व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, कुटुंबाचे छायाचित्र, कूपन, व्यावसायिक कार्ड, स्थानिक चलनानुसार ५० डॉलर म्हणजेच ३ हजार ६०० रुपये ठेवण्यात आले होते. यानंतर कोणत्या शहरामधून किती पाकिटे परत आणून देण्यात येतात याची वाट पाहण्यात आली.

हेही वाचा… सेंट जॉर्जेस रुग्णालयातील रक्तशुद्धीकरण केंद्रासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखणार; सर्वसामान्यांना अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी प्रयत्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हलसिंकीमधील नागरिकांनी पैसे असलेली ११ पाकिटे परत आणून दिली आणि जगातील सर्वात प्रामाणिक शहर होण्याचा बहुमान या शहराने पटकावला. मुंबईमधील नागरिकांनी १२ पैकी नऊ पाकिटे परत आणून दिली. त्यामुळे मुंबई जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रामाणिक शहर ठरले, तर न्यूयॉर्क व बुडापेस्टमध्ये आठ, मॉस्को व एम्सटर्डमध्ये सात, बर्लिन व ल्यूबलियानामध्ये सहा, लंडन व व्हर्सायमध्ये प्रत्येकी पाच, रियो दि जानेरो, झ्युरिक, बुखारेस्टमध्ये प्रत्येकी चार, प्रागमध्ये तीन आणि माद्रिदमध्ये दोन पाकिटे नागरिकांनी परत आणून दिली. तर पोर्तुगालची राजधानी असलेल्या लिस्बनमधील नागरिकांनी १२ पैकी अवघे १ पाकिट परत आणून दिल्यामुळे हे शहर जगातील प्रामाणिक शहरांच्या यादीत शेवटच्या स्थानावर आहे.