मुंबई- कांदिवलीत एका ६५ वर्ष व्यावसायिकाचा खून झाल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. हल्लेखोर सीसीटीव्ही चित्रिकरणात कैद झाले असून त्यांच्या शोधासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. दुसऱ्या घटनेत शुक्रवारी मध्यरात्री एका इसमाने क्षुल्लक वादातून आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केली आहे. आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

मोहम्मद सय्यद (६५) हे धातूचे व्यावसायिक होते. कांदिवलीच्या चारकोप येथील शासकीय औद्योगिक वसाहतीमध्ये त्यांचा छोटा कारखाना होता. धातू वितळवून तो साच्यात (मोल्डमध्ये) ओतून त्याला आकार देण्याची प्रक्रिया तेथे केली जाते. रविवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे आपल्या कारखान्यात आले होते. त्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास त्यांच्या मृतदेह कारखान्यात आढळला.

हल्लेखोर तासभर कारखान्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारखान्याबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही चित्रिकरणातून हत्येचा प्रकार समोर आला. रविवारी सकाळी दोन अज्ञात व्यक्ती सय्यद यांच्या कारखान्यात आल्या होत्या. हल्ल्याच्या वेळी सय्यद कारखान्यात एकटे होते. काही वेळ ते कारखान्यात होते. त्यानंतर दोन हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने सय्यद यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर त्यांनी हत्यार कारखान्यातील पाण्याच्या टाकीत टाकले. पोलिसांनी ते शस्त्र जप्त केले आहे.

सीसीटीव्हीत आरोपी कैद

कारखान्याच्या बाहेर असेलल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हल्लेखोर टिपले गेले आहेत. त्यांच्या शोधासाठी परिमंडळ ११ च्या अंतर्गत विविध पथके तयार करण्यात आली आहेत. ज्या अर्थी आरोपी सुमारे एक तास कारखान्यात होते ते पाहता आरोपी व्यावसायिकाच्या परिचयाचे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आर्थिक वादातूही ही हत्या झाली असावी अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. सय्यद यांचा वसईतही एक कारखाना आहे.

पतीकडून पत्नीची हत्या

दुसरी हत्या शुक्रवारी मध्यरात्री १ वाजता घडली. कांदिवली पश्चिम येथील रामविजय को-ऑप सोसायटीच्या शेडमध्ये राहत असलेल्या हिमेंद्र राणा (२५) या महिलेची तिच्या पती दासा राणा याने (२८) क्षुल्लक वादातून गळा दाबून हत्या केली. शुक्रवारी दुपारी राणा दांपत्यात भांडण झाले होते.

पैसे न दिल्याने पत्नीची हत्या

याबाबत पोलिसांनी सांगितले की, राणा दांपत्य हे मजूर होते. सोसायटीच्या पुनर्विकास काम सुरू असल्यामुळे हे दांपत्य बांधकाम सुरू असलेल्या जागेजवळ राहत होते. दुपारी १ च्या सुमारास त्याचा पत्नीशी पैशांवरून वाद झाला होता. दासला गावी जायचे होते. पण त्याच्या पत्नीने त्याला पैसे दिले नाहीत. त्यावरून त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर दासाने त्यांच्या मुलासमोर पत्नीचा चादरीने गळा आवळून खून केला.

आरोपी पती अटकेत

कांदिवली पोलिसांनी आरोपी दासा राणा याला राहत्या घरातून अटक केली आहे. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणा याला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.