मुंबई : उपनगरीय लोकलच्या अपघातात मागील १० वर्षात तब्बल २६ हजार ५४७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून त्यापैकी सर्वाधिक म्हणजे १४ हजार १७५ अपघात रुळ ओलांडताना झाले आहेत. पश्चिम रेल्वेने अपघातांमधील फक्त १ हजार ४०८ मृतांच्या नातेवाईकांना १०३ कोटी रुपये, तर जखमींना १४ कोटी रुपयांची आर्थिक मदत (नुकसान भरपाई) दिले आहेत.

मुंबई हे देशातील प्रमुख आणि दाट लोकसंख्येचे शहर आहे. शहराची रचना उत्तर-दक्षिण पसरलेली आहे. त्यामुळे शहरांतर्गत प्रवासासाठी लोकल अपरिहार्य आहे. मुंबईकरांच्या जीवनात लोकलचे स्थान हे केवळ एक वाहतूक साधन नसून, ती शहराची जीवनवाहिनी (लाईफलाईन) बनली आहे. दररोज ७० लाखांहून अधिक प्रवासी मुंबई लोकलने प्रवास करतात. लाखो लोकांचे दैनंदिन व्यवहार उपनगरीय लोकलवर अवलंबून आहे.

रेल्वे प्रवास धोकादायक

शहरातील लोकसंख्या सतत वाढत असल्याने त्याचा ताण लोकलवर पडत आहे. प्रचंड गर्दीमुळे लोकलमधून खाली पडणे, रुळ ओलांडताना, फलाटावरील पोकळीत पडून, वीजेचा धक्का लागून, चेंगराचेंगरीमुळे दररोज अपघात होत असतात. दररोज मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गावर होणाऱ्या अपघातांत सरासरी ८ जणांचा मृत्यू होतो.

रेल्वेच्या एका डब्यात १,८०० प्रवाशांचीगर्दीने होते. प्रत्यक्ष क्षमतेपेक्षा २–३ पट अधिक प्रवासी डब्यामध्ये सामावलेले असतात. त्यामुळे चढताना किंवा उतरताना धक्काबुक्की होते. परिणामी प्रवासी लोकलमधून खाली पडतात. नाईलाजाने अनेक प्रवासी लोकलच्या उघड्या दरवाजात लटकून प्रवास करतात. जागा नसल्यामुळे प्रवासी दरवाजाच्या पायऱ्यांवर (फुटबोर्ड) उभे राहतात. त्यामुळे विद्युक खांब, किंवा इतर वस्तूंना धडक बसून अपघात होतो. वेळ वाचवण्यासाठी बरेच लोक रूळ ओलांडतात. यामुळे लोकलच्या धडकेने अनेकांचा मृत्यू होतो. या अपघातांची संख्या दरवर्षी वाढतच आहे.

१० वर्षात २६ हजार ५४७ प्रवाशांचा मृत्यू

मागील १० वर्षांत लोकलमध्ये किती प्रवाशांचा मृत्यू झाला याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते आणि वॉच डॉग संस्थेचे अध्यक्ष गॉडफ्री पिमेंटा यांनी माहिती मागवली होती. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी २०१५ ते मे २०२५ या १० वर्षांच्या कालावधीत एकूण २६ हजार ५४७ प्रवाशांचा विविध अपघात आणि दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. त्यात सर्वाधिक म्हणजे १४ हजार १७५ जणांचा मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना झाला आहे. त्यापाठोपाठ लोकलमधून पडणे, रेल्वे खांबाला घडक, वीजेचा धक्का, आत्महत्या आदी कारणांचा समावेश आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या व्यवस्थात्मक दुर्लक्षपणामुळे हे मृत्यू झाल्याचा आरोप मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे उपाध्यक्ष सिध्देश देसाई यांनी केला आहे. योग्य पायाभूत सुविधा आणि आणि नियोजनाद्वारे मृत्यू दर कमी करता येतील, असेही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१०३ कोटींची मदत

रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या वारसांना रेल्वेकडून आर्थिक मदत दिली जाते. रेल्वेने १ जानेवारी २०१५ ते ३१ मे २०२५ या १० वर्षांच्या कालावधीत झालेल्या १ हजार ४०८ मृतांच्या वारसांना १०३ कोटी ७१ लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. तर ४९४ जखमींना १४ कोटी २४ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते गॉडफ्री पिमेंटा यांना रेल्वेने माहिती अधिकारात ही माहिती दिली आहे. रेल्वे नुकसान भरपाई देताना कडक निकष लावते, त्यामुळे पीडितांच्या कुटुंबियांना मदत मिळत नाही, असा आरोप पिमेंटा यांनी केला आहे. तर मृत अथवा जखमी प्रवाशांचे कुटुंबिय मदतीसाठी पाठपुरावा करीत नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.