मुंबई : पश्चिम रेल्वेवरील अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा कोलमडली. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे बराचवेळ लोकल सेवा खंडित झाल्याने आणि अनेक लोकल रद्द करण्यात आल्याने परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कोंडी झाली. काही मिनिटांच्या लोकल प्रवासासाठी प्रवाशांना एक तास खर्ची करावा लागला. लोकल अवेळी धावत असल्याने पश्चिम रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकात प्रचंड गर्दी झाली होती.

मंगळवारी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान अप धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर पाॅइंटमध्ये तांत्रिक बिघाड झाला. परिणामी, या मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली. चर्चगेट दिशेकडे जाणाऱ्या धीम्या लोकलचा प्रवास रखडल्याने, चर्चगेटवरून डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकल अवेळी पोहचल्या. त्यामुळे स्थानकात लोकल फेरी रद्द केली जात असल्याची वारंवार घोषणा केली जात होती.

रेल्वेगाड्या आणि लोकलच्या वक्तशीरपणामध्ये भारतीय रेल्वेच्या सर्वोच्च यादीत पश्चिम रेल्वेचे नाव आहे. लोकल वेळेत धावत असल्याने प्रवाशांचा नियोजित प्रवास योग्यवेळी होतो. परंतु मंगळवारी अंधेरी येथे पाॅइंट बिघाडामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. लोकलमध्ये बराचवेळ बसून, लोकल मार्गस्थ होत नसल्याने किंवा कूर्मगतीने मार्गस्थ होत असल्याने प्रवाशांनी पश्चिम रेल्वे विषयी प्रचंड संताप व्यक्त केला. दररोजचा २० मिनिटांचा प्रवास एक तासांवर गेल्याने, प्रवाशांनी पश्चिम रेल्वेच्या नावाने बोटे मोडली.

पाॅइंड बिघाडाची माहिती संबंधित विभागाला कळताच, घटनास्थळी अधिकारी आणि कर्मचारी पोहचले. त्यानंतर दुरुस्तीची कामे हाती घेतली. सुमारे ३.१५ तास दुरूस्तीसाठी लागली. सायंकाळी ७ वाजता पाॅइंटमधील बिघाड दूर केला. पश्चिम रेल्वेच्या बिघाडामुळे सुमारे ३२ लोकल रद्द झाल्या. तर, शेकडो लोकल विलंबाने धावल्या. तसेच रात्री ८ वाजेनंतरही लोकल उशिराने धावत होत्या.

या लोकल सेवा रद्द

पश्चिम रेल्वेवरील तांत्रिक बिघाडामुळे चर्चगेट ते बोरिवली लोकल सेवेचा खोळंबा झाला. दुपारी ३.५६, ४.०५, ४.२१, ४.३३, ४.४६, ४.५४, सायंकाळी ५.१०, ५.२४, ५.२८, ५.३९, ५.४५, ५.५३, ५.५०, ६.०६ या वेळेच्या चर्चगेट ते बोरिवली दरम्यान धावणाऱ्या लोकल रद्द झाल्या.

  • दुपारी ४.४३ आणि सायंकाळी ५.०७ या वेळेच्या चर्चगेट ते अंधेरी दरम्यान धावणाऱ्या लोकल रद्द झाल्या.
  • सायंकाळी ५.३६, ६.३७, ५.५६ या वेळेच्या अंधेरी-चर्चगेट दरम्यान धावणाऱ्या लोकल रद्द झाल्या.
  • दुपारी ४.५०, सायंकाळी ५.१३, ५.३१, ५.४४, ५.५७, ६.०८, ६.२४, ६.१९, ६.२४, ६.३७, ६.५८, ६.५२ , ७.२१ या वेळेच्या बोरिवली ते चर्चगेट दरम्यान धावणाऱ्या लोकल रद्द झाल्या.
  • सायंकाळी ५.१५ चर्चगेट ते बोरिवली जलद वातानुकूलित लोकल रद्द करण्यात आली. या लोकलऐवजी सामान्य लोकल चालवली.
  • सायंकाळी ६.०८ बोरिवली ते चर्चगेट जलद वातानुकूलित लोकल रद्द करण्यात आली. या लोकलऐवजी सामान्य लोकल चालवली.