Mumbai Local Trains update मुंबई : अनंत चतुर्दशी, आठवडाअखेरची सुट्टी आणि ईदनिमित्त सोमवारी मिळालेल्या सुट्टीनंतर मुंबईतील नोकरदारांनी मंगळवारी कार्यालयात पोहोचण्यासाठी रेल्वे स्थानक गाठले. मात्र मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा मंगळवारी सकाळपासून विलंबाने धावत होत्या. परिणामी, या लेटलतीफ कारभाराचा आणि गर्दीचा प्रवाशांना सामना करावा लागला.
मध्य रेल्वेवरील विद्याविहार – कुर्लादरम्यान सकाळी ८.५५ वाजता अत्यावश्यक देखभालीची कामे करण्यासाठी वेगमर्यादा लागू करण्यात आली होती. त्यामुळे विद्याविहार – कुर्ला अप मार्गावर लोकल ताशी ३० किमी वेगाने धावू लागली. परिणामी, रेल्वे प्रवाशांचा खोळंबा झाला. वेग मंदावल्याने, लोकल एका मागे एक रखडत मार्गस्थ होत होत्या. सकाळी गर्दीच्या वेळी अत्यावश्यक देखभालीची कामे सुरू केल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले.
संपूर्ण दिवसभरात मध्य रेल्वेवरील अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तर, नियोजित वेळापत्रकाच्या तुलनेत प्रचंड विलंबाने धावणाऱ्या धीम्या लोकल अंतिम स्थानकात वेळेत पोहोचण्यासाठी अर्धजलद करण्यात आल्या. त्यामुळे या लोकल कल्याण – ठाणेदरम्यान सर्व स्थानकांत थांबल्या. त्यापुढे मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा आणि सीएसएमटी स्थानकांवर थांबल्या. तर, काही धीम्या लोकल कल्याणनंतर जलद करण्यात आल्या.
या लोकल कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुलुंड , घाटकोपर , कुर्ला, दादर, भायखळा आणि सीएसएमटी स्थानकांवर थांबल्या. परंतु, अचानक लोकलच्या वेळापत्रकात बदल केल्याने, धीम्या मार्गावरील स्थानकावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. धीम्या मार्गावरील स्थानकात लोकल थांबत नसल्याने प्रवाशांची गर्दी झाली होती.
पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. परंतु, वातानुकूलित लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी जास्त झाल्याने, त्यांचे दरवाजे बंद होण्यास अडचणी येत आहेत. मंगळवारी सकाळी ७.१५ ते ८.२० दरम्यान वसई रोड – बोरिवलीदरम्यान तीन वातानुकूलित लोकलचे दरवाजे बंद होत नव्हते. त्यामुळे लोकल बराच वेळ स्थानकात उभी होती. परिणामी, पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले.
मध्य रेल्वेवरील कर्जत-खोपोली येथे ब्लाॅक संपला
मध्य रेल्वेवरील कर्जत – खोपोलीदरम्यान ओएचइ व अभियांत्रिकी कामांसाठी ७ ते ९ सप्टेंबरदरम्यान वाहतूक आणि पाॅवर ब्लाॅक घेण्यात आला होता. दररोज दुपारी २.३० ते सायंकाळी ५ पर्यंत या ब्लाॅकचे नियोजन करण्यात आले होते. ब्लाॅक कालावधीत कर्जत – खोपोली लोकल सेवा बंद ठेवण्यात आली होती. परिणामी, सलग तीन दिवस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून खोपोलीला जाणारी लोकल कर्जतपर्यंत चालवण्यात आली. तर, कर्जत – खोपोलीदरम्यान ही लोकल रद्द करण्यात आली होती. खोपोली – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल खोपोलीऐवजी कर्जत येथून चालविण्यात येत होती. खोपोली – कर्जतदरम्यान लोकल सेवा रद्द करण्यात आली होती.