करोनाचं संकट मुंबईवर घोंगावू लागलं आहे. राज्य सरकारकडून करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न होत असताना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या आठ दिवसात महाराष्ट्रात ३९ जणांना संसर्ग झाला आहे. विशेष म्हणजे गर्दी असलेल्या शहरात हा आजार झपाट्यानं पसल्यानं सरकारकडून मुंबई, पुण्यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. अशात सर्वात मोठा धोका असलेल्या मुंबईतील लोकल आणि मेट्रो सेवा बंद करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सरकारची भूमिका मांडली आहे.

करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळी पावले उचलण्यात येत आहेत. गर्दीमुळे हा व्हायरस अधिक पसरण्याची शक्यता असल्यामुळे गर्दी अजून कशी कमी करता येईल यावर राज्य सरकारचा भर आहे. आज याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्य सरकार आणि खासगी कंपन्यांमध्ये चर्चा झाली. लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, औषध आणि मनोरंजन क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. जवळपास २५ कंपन्यांचे प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

आणखी वाचा- लॉक डाऊन म्हणजे काय? महाराष्ट्रात काय होणार?

याबैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. टोपे म्हणाले,’राज्य सरकारकडून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानी द्या, असा प्रस्ताव या कंपन्यांसमोर ठेवण्यात आला. त्यावेळी अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे,’ असं त्यांनी सांगितलं. यावर करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार मुंबईतील लोकल आणि मेट्रो सेवा बंद करणार आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राजेश टोपे म्हणाले,’लोकल आणि मेट्रो सेवा बंद करण्याचा निर्णय माझ्या विभागाच्या अधिकारात येत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्या बैठकीत यासंदर्भात चर्चा होणार आहे. परिस्थितीचा विचार करून मुख्यमंत्री याचा निर्णय घेतील. तूर्तास कमी कमीत कमी गर्दी लोकलमध्ये असावी याकडं लक्ष देत आहोत. त्याचबरोबर लोकलची स्वच्छता ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,’ अशी माहिती त्यांनी दिली.

आणखी वाचा- Coronavirus : संसर्ग रोखण्यासाठी पंकजा मुंडेंचा राज्य सरकारला मोठा सल्ला

पंकजा मुंडे यांनीही दिला सल्ला –

“मुंबई बंदची मदत होऊ शकते का? जर नियोजनबद्ध पद्धतीनं मुंबई बंद केली, तर लोक जीवनावश्यक वस्तू घरात आणून ठेवतील. जर सात दिवसांसाठी लोकल सेवा बंद ठेवल्यास लाखो लोकांना करोनाच्या संसर्गापासून रोखण्यास मदत होईल. फक्त लोकांना आवश्यक असेल, त्या वस्तूंची दुकानं उघडी ठेवण्यात यावी,” असा सल्ला भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विट करून दिला आहे.