मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून सीएसएमटी परिसरात मराठा आंदोलकांचे आंदोलन सुरू आहे. रविवारीही सीएसएमटी रेल्वे स्थानकात मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, जल्लोष सुरू होता. अनेक तरूण मराठा आंदोलकांनी ध्वनिक्षेपक डोक्यावर घेऊन, नाचत मनोज जरांगे पाटील यांचा जयजयकार केला. ‘हाय तलवारीची धार, जरांगे पाटील एक नंबर’, ‘आ गये मराठे’, ‘मराठे लीडर’, ‘मराठ्यांचा कैवारी’ अशी विविध गाणे वाजवली जात होती.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)मध्ये मराठा आंदोलक जमले आहेत. झोपण्यासाठी, जेवण्यासाठी आणि जल्लोष करण्यासाठी सीएसएमटी स्थानक हे मराठा आंदोलनाचे केंद्र बनले आहे. राज्यभरातील बहुसंख्य मराठा आंदोलक रेल्वे मार्गाने मुंबई गाठत आहेत. तसेच मुंबई महानगरातील मराठा आंदोलक मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर मार्गाने सीएसएमटी स्थानक गाठत आहेत. पनवेल, वाशी, नेरूळ, कल्याण, ठाणे येथून आंदोलक येत आहेत. त्यामुळे सर्वांची गर्दी सीएसएमटी स्थानकात जमली आहे. प्रत्येक लोकलमधून आंदोलक उतरून, जल्लोषात सहभागी झाले. तसेच सीएसएमटीच्या मुख्य इमारतीच्या समोरील दुतर्फा रस्त्यावरही ध्वनिक्षेपक लावून, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नावाचा जयजयकार करणाऱ्या गाण्यांवर नाचत होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान करून, एक मराठा आंदोलक आंदोलनात सहभागी झाला होता. तसेच, एक आंदोलक लोटांगण घालून, आझाद मैदानात आला होता.
आंदोलनात अबालवृद्धांचा सहभाग
मराठा आंदोलनात तरुणांचे प्रमाण अधिक आहे. त्यासह काही आंदोलक लहान मुलांनाही घेऊन आले आहेत. मराठ्यांनी आरक्षण मिळण्यासाठी घोषणाबाजी केली. तसेच महिला आंदोलक आणि वृद्ध आंदोलकांनी देखील हजेरी लावली होती.
सीएसएमटीत तरुणांचा जल्लोष
सीएसएमटी नाचगाणे सुरू असताना, काही तरुणांनी बॅरिकेटसवर बसून ढकलगाडी तयार केली. तशीच ढकलगाडी मरिन ड्राईव्ह परिसरात मराठा आंदोलकांनी केली होती.